All England Open 2026: भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये विजयाचा डंका वाजवला आहे. 3 मार्च रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या चुरशीच्या लढतीत लक्ष्यने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या शि युकीचा पराभव करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयामुळे लक्ष्यने केवळ दुसऱ्या फेरीत प्रवेश केला नाही, तर आपल्या टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अटीतटीच्या लढतीत लक्ष्यची सरशी
सामन्याच्या सुरुवातीपासूनच लक्ष्य सेनने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या सेटमध्ये त्याने ब्रेकपर्यंत 11-7 अशी भक्कम आघाडी घेतली होती. पुढे ही आघाडी 17-12 पर्यंत पोहोचली, मात्र अनुभवी शि युकीने जोरदार पुनरागमन करत 20-20 अशी बरोबरी साधली. लक्ष्यने तीन गेम पॉइंट गमावले, पण मोक्याच्या क्षणी संयम राखत क्रॉस-कोर्ट स्मॅशच्या जोरावर पहिला सेट 23-21 असा आपल्या नावावर केला.
निर्णायक सेटमध्ये मिळवला ऐतिहासिक विजय
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली, जो शि युकीने 19-21 असा जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. सर्वांच्या नजरा आता तिसऱ्या आणि निर्णायक सेटवर होत्या. सुरुवातीला 6-6 अशी बरोबरी झाल्यानंतर, लक्ष्यने चपळाई दाखवत ब्रेकपर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत लक्ष्यने 18-14 आणि शेवटी 21-17 च्या फरकाने तिसरा सेट जिंकत सामना 2-1 असा खिशात घातला.
हेही वाचा - IPL 2026: RCB चाहत्यांची प्रतीक्षा संपली! चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा रंगणार क्रिकेटचा थरार; पाहा IPL 2026 चे वेळापत्रक
मिश्र दुहेरीत भारताची विजयी घोडदौड; मालविका पराभूत
लक्ष्य सेनव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूंनीही संमिश्र कामगिरी केली. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या जोडीने मलेशियाच्या हू पेंग रॉन आणि चेंग सू यिन यांचा 21-17, 21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. मात्र, महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चीनच्या चेन यू फेईने मालविकाचा 11-21, 6-21 असा एकतर्फी पराभव केला.