Friday, June 12, 2026 10:54:58 PM

IPL 2026 : चेन्नईच्या पठ्ठ्याने केली एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडणारी धडाकेबाज खेळी; 13 चेंडूंमध्ये रचला इतिहास

चेन्नईचा 27 वर्षीय फलंदाज उर्विल पटेलने लखनौच्या गोलंदाजांची पिसे काढत ऐतिहासिक खेळी साकारली. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उर्विलने अवघ्या 23 चेंडूंमध्ये 65 धावा कुटल्या.

ipl 2026  चेन्नईच्या पठ्ठ्याने केली एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडणारी धडाकेबाज खेळी 13 चेंडूंमध्ये रचला इतिहास

Urvil Patel: आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात एका नव्या वादळाचा उदय झाला आहे. चेन्नईचा 27 वर्षीय फलंदाज उर्विल पटेलने लखनौच्या गोलंदाजांची पिसे काढत ऐतिहासिक खेळी साकारली. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उर्विलने अवघ्या 23 चेंडूंमध्ये 65 धावा कुटल्या. या खेळीदरम्यान त्याने केवळ 13 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण करत क्रिकेट विश्वाला थक्क केले.

आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाची बरोबरी
उर्विल पटेलने आपल्या खेळीत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत यशस्वी जैस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आयपीएल इतिहासात आता यशस्वी जैस्वाल (13 चेंडू) आणि उर्विल पटेल (13 चेंडू) हे संयुक्तपणे सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज ठरले आहेत. याशिवाय, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सुरेश रैनाचा 16 चेंडूंतील अर्धशतकाचा 12 वर्षे जुना विक्रमही उर्विलने मोडीत काढला आहे.

एबी डिव्हिलियर्सचा 'तो' विक्रम इतिहासजमा
उर्विल पटेलने केवळ वेगवान अर्धशतकच झळकावले नाही, तर त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला. 2015 मध्ये डिव्हिलियर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या 10 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या होत्या. उर्विलने लखनौविरुद्ध पहिल्या 10 चेंडूंत 42 धावा कुटत डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. डावाच्या सुरुवातीलाच इतकी आक्रमक फलंदाजी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

पहिल्या 8 चेंडूंत 6 षटकार: नवा जागतिक विक्रम
उर्विलच्या या खेळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या डावातील पहिल्या 8 चेंडूंमध्ये तब्बल 6 षटकार खेचले. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे चेन्नईला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे झाले. लखनौच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीवर त्याने मिळवलेले हे वर्चस्व आगामी काळातील त्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी मानली जात आहे.

हेही वाचा - IPL 2026: 6, 6, 6, 6... चेन्नईसमोर लखनौच्या 'या' पठ्ठ्याचा तुफान फटकेबाजी; निकोलस पूरनचा रेकॉर्ड मोडत रचला नवा विक्रम

आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतकवीर:
यशस्वी जैस्वाल: 13 चेंडू (वि. कोलकाता, 2023)

उर्विल पटेल: 13 चेंडू (वि. लखनौ, 2026)

केएल राहुल: 14 चेंडू (वि. दिल्ली, 2018)

पॅट कमिन्स: 14 चेंडू (वि. मुंबई, 2022)

रोमारियो शेफर्ड: 14 चेंडू (वि. चेन्नई, 2025)


सम्बन्धित सामग्री