Tuesday, March 17, 2026 02:49:21 PM

Bangladesh PM Oath : बांगलादेश स्थिरावणार का? होतेय नव्या युगाची सुरुवात; तारिक रहमान यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

शेख हसीना यांच्या निर्गमनानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून तारिक रहमान आता बांगलादेशचे नवे नेतृत्व करणार आहेत.

bangladesh pm oath  बांगलादेश स्थिरावणार का होतेय नव्या युगाची सुरुवात तारिक रहमान यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

Bangladesh PM Oath :  शेख हसीना यांच्या सत्तेनंतर बांगलादेश आता एका नवीन लोकशाही युगात प्रवेश करत आहे. मंगळवारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे प्रमुख  तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राष्ट्रीय संसदेच्या 'साउथ प्लाझा' येथे त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शेख हसीना यांच्या निर्गमनानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून तारिक रहमान आता बांगलादेशचे नवे नेतृत्व करणार आहेत.

निवडणुकीत BNP चा ऐतिहासिक विजय
दरम्यान, 13 व्या संसदीय निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली BNP ने 297 पैकी 209 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. तर त्यांचे सहयोगी पक्ष असलेल्या कट्टरपंथी जमात-ए-इस्लामीला 68 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या 'अवामी लीग'वर बंदी घालण्यात आली होती. विजयानंतर BNP खासदारांनी एकमताने तारिक रहमान यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली.

हेही वाचा - Imran Khan : इम्रान खान यांच्या समर्थनासाठी क्रिकेट विश्व एकवटले; गावस्कर, कपिल देव यांच्यासह 14 माजी कर्णधारांचे पाकिस्तान सरकारला पत्र

भारताचे प्रतिनिधित्व आणि राजनैतिक संबंध
या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री उपस्थित होते. ओम बिर्ला यांनी 'X' वर पोस्ट करत या सोहळ्याला उपस्थित राहणे सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले आणि सामायिक लोकशाही मूल्ये अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते, मात्र मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतच्या पूर्वनियोजित चर्चेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदनाचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारताचा पाठिंबा दर्शविला. भारत आणि बांगलादेश हे केवळ शेजारी नसून त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध खोलवर रुजलेले आहेत, असे सांगत मोदींनी दोन्ही देशांच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
 


सम्बन्धित सामग्री