Saturday, January 25, 2025 08:03:40 AM

accused-sanjay-more-had-license-police-probe
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर ; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधून पोलीस पडताळणी करणार आहेत. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय मोरे याआधी मिनीबस आणि इतर छोटे वाहन चालवत होता, पण...

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर  मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई : कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताच्या तपासात बरीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

 

चालक संजय मोरे (५४) हा १ डिसेंबरपासून बेस्ट बस सेवा अंतर्गत चालक म्हणून रुजू झाला होता. त्याने याआधी कोणतेही मोठे वाहन चालवले नव्हते. पोलिसांच्या प्रारंभिक चौकशीत, चालकाच्या तांत्रिक अनुभवाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्या वैद्यकीय तपासणीत मद्यपानाचा कोणताही पुरावा न सापडल्याचे सांगितले आहे. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

अपघाताच्या वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे - विजय विष्णू गायकवाड (७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा (१९), अनम शेख (२०), कणीस फातिमा गुलाम कादरी (५५), शिवम कश्यप (१८) आणि फारूक चौधरी (५४) अशी आहेत.

पोलिसांची तपास प्रक्रिया : चालक संजय मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू असून, बेस्ट प्रशासनाशी चर्चा करून तपासाच्या पुढील टप्प्यावर ठोस पावले उचलली जातील. चालकाच्या नियुक्तीसाठी असलेल्या निकषांची सखोल चौकशी केली जाईल. आरोपी संजय मोरेकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे. पोलिसांनी त्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. संजय मोरेला चालक म्हणून नियुक्त करताना आवश्यक निकष पाळण्यात आले होते का, याची चौकशी सुरू आहे. बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधून पोलीस पडताळणी करणार आहेत. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय मोरे याआधी मिनीबस आणि इतर छोटे वाहन चालवत होता, पण मोठ्या बस चालवण्याचा अनुभव त्याच्याकडे नव्हता.

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज : सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी मोठी गर्दी उसळलेली दिसते, आणि पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी दाखल व्हावे लागले. अपघातात जखमी झालेल्या चार पोलीस आणि एमएसएफ जवानांवर उपचार सुरू आहेत.

या दुर्दैवी अपघातामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना योग्य मदत मिळावी आणि जखमींना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे.

अपघातातील मृतांची नावे:
विजय विष्णू गायकवाड (७०)
आफ्रीन अब्दुल सलीम शहा (१९)
अनम शेख (२०)
कणीस फातिमा गुलाम कादरी (५५)
शिवम कश्यप (१८)
फारूक चौधरी (५४)

मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत 
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.  या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

कुर्ला बस अपघातावर वडेट्टीवार काय म्हणाले ?
 कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगर रोड भागात भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. अपघातात ६ जणांचा मृत्यू  आणि ४३ नागरिक गंभीर जखमी झाल्याचे माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना. 
 
या अपघातातील बस चालक हा कंत्राटी असून चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोठी वाहन चालवण्याचा अनुभव नसताना या ड्रायव्हरला काम मिळाले कसे, एवढी मोठी बस चालवायला देताना आधी तपासले नव्हते का ड्रायव्हर बस चालवू शकतो का? या अक्षम्य कारभार साठी बेस्ट प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांना आणि अपघातात जखमींना तातडीने सरकारने मदत द्यावी ही आमची मागणी आहे.


सम्बन्धित सामग्री