Shiv Jayanti 2026 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी शिवनेरीच्या मातीला वंदन करताना रितेशने केलेल्या एका संवेदनशील कृतीने उपस्थित शिवभक्तांचे आणि नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
'बालशिवाजी'समोर रितेश नतमस्तक
शिवनेरी गडावर दर्शनासाठी गेलेल्या रितेशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रितेश मनोभावे महाराजांसमोर नतमस्तक झालेला दिसत आहे. गडावर महाराजांच्या दर्शनासाठी काही चिमुकले 'बालशिवाजी'च्या रूपात आले होते. या चिमुकल्यांना पाहताच रितेशने अत्यंत अदबीने त्यांच्यासमोर झुकून अभिवादन केले. एका लहान मुलाने रितेशच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला असता, रितेशने त्याला त्वरित सावरले आणि स्वतः त्याच्यासमोर नम्रपणे झुकून आदरातिथ्य दर्शवले.
हेही वाचा - Chhatrapati Shivajimaharaj Jayanati 2026 : शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवजन्मोत्सव साजरा
तरुणांना दिला महत्त्वाचा संदेश
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रितेशने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, "आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत सौभाग्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि त्यांची कीर्ती आजही आपल्याला नवीन ऊर्जा देते. महाराजांनी या राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आणि त्यांचे विचार प्रत्येक लहान मुलापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे."
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची उत्सुकता
रितेश देशमुख लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवरील भव्य ऐतिहासिक चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तो स्वतःच करत आहे. विशेष म्हणजे, या मराठी चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सलमान खान आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खान यामध्ये 'जीवा महाला' यांची व्यक्तिरेखा साकारणार असून संजय दत्त 'अफजल खान'च्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Shiv Jayanti 2026 : शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार? जाणून घ्या शिवरायांचा गौरवशाली इतिहास आणि आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश