Monday, February 09, 2026 02:19:42 PM

Final Flight : प्रदीर्घ सेवेनंतर कॅप्टन ओम यांनी घेतली 'शेवटची झेप'; आपल्या 23 वर्षांच्या सहकाऱ्याला केलं 'असं' गुडबाय

कॅप्टन ओम यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ विमान उडवले नाही, तर एक यशस्वी नेतृत्व देखील निभावले. फर्स्ट ऑफिसरपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जाणून घेऊ..

final flight  प्रदीर्घ सेवेनंतर कॅप्टन ओम यांनी घेतली शेवटची झेप आपल्या 23 वर्षांच्या सहकाऱ्याला केलं असं गुडबाय

Final Flight : एअर इंडिया एक्सप्रेसचे ज्येष्ठ वैमानिक कॅप्टन ओम यांनी तब्बल 23वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आकाशातून कायमचा निरोप घेतला. त्यांच्या शेवटच्या विमान उड्डाणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, एका वैमानिकाचा आपल्या कामाप्रती असलेला जिव्हाळा पाहून नेटिझन्स भावुक झाले आहेत.

पालकांचे आशीर्वाद आणि प्रवासाची सुरुवात
कॅप्टन ओम यांच्या या भावुक प्रवासाचा व्हिडिओ त्यांच्या मुलीने चित्रित करत सर्व माहिती दिली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला कॅप्टन ओम आपल्या कर्तव्यावर जाण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेताना दिसतात. त्यांच्या मुलीने म्हटले की, "शेवटी तो दिवस आलाच!" 23 वर्षांपूर्वी सुरू झालेले हे स्वप्न आज आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले होते. पायलट बनण्यापूर्वी त्यांना 2 वर्षे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागले होते, ज्यानंतर त्यांनी एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये आपला प्रदीर्घ काळ व्यतीत केला. आपल्या कारकिर्दीत हजारो पायलटला प्रशिक्षण देणारे कॅप्टन ओम आज स्वतः एक ऐतिहासिक क्षण अनुभवत होते.

विमानातील ती शेवटची घोषणा
जेव्हा कॅप्टन ओम शेवटच्या उड्डाणासाठी विमानात पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत फुले आणि केक देऊन करण्यात आले. विमानाने टेक-ऑफ केल्यानंतर त्यांनी प्रवाशांशी संवाद साधताना एक खास घोषणा केली. ते म्हणाले, "आजचे हे उड्डाण माझ्यासाठी सर्वात खास आहे, कारण आज पहिल्यांदाच माझी पत्नी आणि मुलगी माझ्यासोबत प्रवास करत आहेत... आणि आज माझे हे शेवटचे उड्डाण देखील आहे." त्यांनी प्रवाशांना आश्वस्त करताना मिश्किलपणे जोडले की, "काळजी करू नका, तुम्ही सुरक्षित हातात आहात. माझ्याकडे 23 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे."

हेही वाचा - Ajit Pawar Viral Post: ‘जर आपले विमान किंवा हेलिकॉप्टर सुरळीतपणे…’ अजित पवारांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता; दादांची 2024 मधली 'ती' पोस्ट पुन्हा चर्चेत

प्रगतीचा प्रवास आणि आत्मिक समाधान
कॅप्टन ओम यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ विमान उडवले नाही, तर एक यशस्वी नेतृत्व देखील निभावले. फर्स्ट ऑफिसरपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कॅप्टन, चेक पायलट, इन्स्ट्रक्टर आणि शेवटी एक्झॅमिनरपर्यंत पोहोचला. आपल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात की, "मला असे वाटते की माझ्या करिअरमध्ये मी सर्व काही साध्य केले आहे. मी आता पूर्णपणे समाधानी आहे." हजारो वैमानिकांना घडवल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता.

विमानाचा निरोप आणि पित्याची आठवण
उड्डाण संपल्यानंतर जेव्हा कॅप्टन ओम विमानातून खाली उतरले, तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या एअरक्राफ्टला वाकून एक शेवटचे चुंबन घेतले. हा क्षण पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सहकाऱ्याचे डोळे पाणावले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढली. ते म्हणाले की, "माझे वडील हे माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान, एक उत्तम वैमानिक आणि त्याहूनही चांगली व्यक्ती होते." एक स्वप्न पूर्ण करून आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देऊन कॅप्टन ओम आज सन्मानाने निवृत्त झाले आहेत.

हेही वाचा - Alex Honnold : दोरी नाही, सुरक्षा नाही, फक्त जिद्द... पठ्ठ्याने सर केली 1667 फूट उंच इमारत, पाहा थरारक दृश्य


सम्बन्धित सामग्री