मुंबई: अहमदाबाद अपघातानंतर आता सर्वच कंपन्या उड्डाणाच्या बाबतीत सर्तक झाल्या आहेत. मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI639 च्या क्रू मेंबर्सना केबिनमध्ये जळण्याचा वास आला. त्यानंतर पायलटने खबरदारी म्हणून विमानाचे मुंबईला आपत्कालीन लँडिंग केले. याबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'शुक्रवार, 27 जून 2025 रोजी मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या फ्लाईट AI639 च्या क्रू मेंबर्सना केबिनमध्ये जळण्याचा वास येत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत परतावे लागले. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले. तसेच विमान बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अनपेक्षित व्यत्ययामुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मुंबईतील आमच्या ग्राउंड सहकाऱ्यांनी प्रवाशांना सर्व आवश्यक मदत केली. एअर इंडियामध्ये, आमच्या पाहुण्यांची आणि क्रूची सुरक्षितता आणि कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.'
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी मोठा विमान अपघात झाला होता. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान निवासी भागात कोसळले होते. अहमदाबाद विमान अपघाताच्या दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर, डीएनएद्वारे शेवटचा बळीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. या अपघातातील मृतांची संख्या आता 260 वर पोहोचली आहे. शेवटच्या मृताचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कुटुंबियांसह उद्योगपती गौतम अदानी सहभागी झाले जगन्नाथ रथयात्रेत
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या मेघनानगर भागातील एका वसतिगृह संकुलात कोसळले होते. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातून केवळ एक व्यक्ती वाचला.