Ajit Pawar Death Yugendra Pawar Emotional Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात 'अजितदादां'चा अंत झाला. ही बातमी समजताच त्यांचे पुतणे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. बारामती येथील निवासस्थानाबाहेर युगेंद्र पवारांनी टाहो फोडल्याचा एक हृदय हेलावणारा व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या लाडक्या काकांना असा अचानक निरोप देण्याची वेळ आल्याचे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. पवार कुटुंबावर कोसळलेला हा प्रसंग म्हणजे शब्दांच्या पलीकडचा आघात असून, घरातील ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब खचून गेले आहे.
अपघाताचा थरार आणि घटनाक्रम
अजित पवार हे आज, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या विविध सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळी 8:40 वाजता बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जवळच्या शेतात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण 6 जणांचा (ज्यामध्ये वैमानिक आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश होता) दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातून कोणीही वाचू शकले नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या जाण्याने कुटुंबीयांसाठी न भरून निघणारी पोकळी! कुटुंबात कोणाच्या होते सर्वात जवळ?
कार्यकर्त्यांची गर्दी आणि कुटुंबाची धाव
अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीतील रुग्णालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रडताना दिसत असून संपूर्ण शहरात शांतता पसरली आहे. आमदार रोहित पवार आणि श्रीनिवास पवार तातडीने रुग्णालयात पोहोचले आहेत. दुसरीकडे, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे दिल्लीत होते, ते तातडीने विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीचा आधारस्तंभ आणि राजकारणातील 'दमदार' आवाज हरपल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
प्रशासकीय तपास आणि अंत्यसंस्कार
नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानात लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाला की अन्य काही कारण होते, याचा तपास केला जात आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 'अजितदादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड जातील, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम