नाशिक : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महायुतीतच राहणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक नियोजन करुनच अर्थसंकल्प तयार केला आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे राज्य शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना मिळणार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. राखी पौर्णिमेआधी १७ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे मिळतील; असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
जनसन्मान यात्रेत अजित पवारांवर हल्ला होण्याचा धोका आहे, असा धोक्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला आहे. पण यात्रा सुरूच राहणार, मी घाबरणार नाही; असे अजित पवार म्हणाले. शरद पवार वंदनीय आहेत, त्यांच्यावर बोलणार नाही; असे अजित पवार यांनी सांगितले. शरद पवारांवर बोलणाऱ्यांना स्वतः काय ते कळायला हवं, असेही अजित पवार म्हणाले.