Wednesday, December 11, 2024 11:00:22 AM

Ajit Pawar
'साहेबांच्याच विचाराने पुढे चाललोय'

अजित पवारांनी भाजपासोबत राहणार असल्याचे संकेत दिले. मतदारसंघातील गावांना भेटी देत असलेल्या अजित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना साहेबांच्याच विचाराने पुढे चाललो आहे, असे सांगितले.

साहेबांच्याच विचाराने पुढे चाललोय

बारामती : साहेबांच्याच विचाराने पुढे चाललो आहे. त्यावेळी सर्व आमदारांचे एकच म्हणणे होते की सत्ता असल्याशिवाय कामे होत नाहीत. वडगाव निंबाळकर सारख्या गावात ५७ कोटींचा निधी आला आहे. सत्तेत सहभागी झालो नसतो तर हा निधी आला असता का ? पिण्याच्या पाण्याची योजना झाली असती का ? रस्त्याची कामे झाली असती का ? असं म्हणत अजित पवारांनी भाजपासोबत राहणार असल्याचे संकेत दिले. मतदारसंघातील गावांना भेटी देत असलेल्या अजित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना साहेबांच्याच विचाराने पुढे चाललो आहे, असे सांगितले.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे काका - पुतण्या आमनेसामने आले आहेत. प्रचारासाठी अजित पवार बारामतीतील गावांना भेटी देत आहेत. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आहेत. माझा प्रचार मीच करेन; असे सांगत अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. 

शरद पवार निवृत्त झाल्यानंतर....

राज्यसभेचे खासदार असलेल्या शरद पवारांचा कार्यकाळ आणखी दीड वर्षे आहे. हा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे संकेत शरद पवारांनी एका कार्यक्रमात दिले. या विषयावर बोलताना पवार साहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार ? फुशारक्या मारत नाही पण दुसरा नवखा बघू शकतो का ? लोकांचे प्रश्न समजले तरच ते सोडवता येतात. यासाठी वेळ लागतो. हे कोणाला जमणार आहे ? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo