Learjet-45 Private Plane : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ते ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या 'लिअरजेट-45' (Learjet 45) बाबत मोठी चर्चा सुरू आहे. डीजीसीएने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, हे एक मध्यम आकाराचे व्यावसायिक 'सुपर लाईट' जेट विमान आहे. कॅनडातील 'बम्बार्डियर एरोस्पेस' या नामांकित कंपनीने या विमानाचे उत्पादन केले असून, हे विमान प्रामुख्याने तातडीचे दौरे आणि व्यावसायिक प्रवासासाठी वापरले जाते. अजित पवारांचे हे विमान 16 वर्षे जुने होते आणि त्याचा टेल नंबर VT-SSK असा होता.
विमानाची तांत्रिक वैशिष्ट्ये आणि वेग
लिअरजेट-45 हे विमान त्याच्या वेगासाठी आणि छोट्या धावपट्ट्यांवर लँडिंग करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. या विमानाचा वेग ताशी 800 ते 850 किमी इतका असून ते एका दमात तब्बल 3000 किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. विमानाची लांबी 58 फूट आणि उंची 14 फूट असून, ते 51000 फूट उंचीवरून उड्डाण करण्यास सक्षम आहे. साधारणपणे 6 ते 8 प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या या विमानात सुरक्षित प्रवासासाठी दोन इंजिन आणि अत्याधुनिक यंत्रणा असते.
विमानात फ्रेश होण्यासाठी एक बाथरूम किंवा स्वच्छतागृहाची सोय असते. प्रवासाची वेळ वाचवण्यात हे विमान मदत करते, त्यामुळे व्यावसायिक किंवा राजकारणी या विमानाला प्रवासासाठी प्राधान्य देतात.
व्हीएसआर (VSR) एव्हिएशन कंपनीची पार्श्वभूमी
अजित पवारांचे हे चार्टर विमान 'व्हीएसआर व्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड' (VSR Aviation) या दिल्लीस्थित कंपनीच्या मालकीचे होते. उद्योगपती व्ही. के. सिंह यांनी ही कंपनी स्थापन केली असून, ती खासगी जेट लीजिंग, हवाई रुग्णवाहिका आणि चार्टर सेवा पुरवते. ज्या ठिकाणी नियमित विमानसेवा उपलब्ध नसते, अशा दुर्गम ठिकाणी प्रवाशांना पोहोचवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीतील महिपालपूर येथे असून, हवाई क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि व्यवस्थापन सेवादेखील ही कंपनी पुरवते.
हेही वाचा - Sharad Pawar First Reaction : 'हा निव्वळ अपघात, घातपात नाही'; अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
कसा घडला दुर्दैवी अपघात?
बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी 8:10 वाजता मुंबईहून निघाले होते. सकाळी 8:45 च्या सुमारास विमान बारामतीजवळ पोहोचले, पण त्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला, जो अयशस्वी ठरला. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करताना खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमान धावपट्टीवरून बाजूला सरकले आणि शेतात कोसळले. या भीषण अपघातात अजित पवारांसह एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तपासाचे चक्र आणि चौकशी
सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. विमानाचा फ्लाइट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) तपासला जात असून, हवामानाचा अहवालही मागवण्यात आला आहे. विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की कमी दृश्यमानतेमुळे, हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
हेही वाचा - '...गेल्या जवळपास 35 ते 40 वर्षांपासून', जयंत पाटील यांची अजित पवारांच्या अचानक निधनावर भावुक पोस्ट; म्हणाले, 'सर्वात वाईट..'