Crime News : अलाहाबाद उच्च न्यायालयाने पत्नी आणि तीन मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रईस नावाच्या व्यक्तीची 23 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाने दबावाखाली दिलेल्या साक्षीतून एका पित्याला आयुष्यातील दोन दशकांहून अधिक काळ तुरुंगात घालवावा लागला. पुराव्यांचा अभाव आणि साक्षींमधील विसंगती पाहता न्यायालयाने रईसला संशयाचा फायदा देऊन मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेनुसार, 29-30 ऑगस्ट 2003 च्या मध्यरात्री घरगुती वादातून रईसने चाकूने वार करून आपली पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप होता.
ती काळरात्र, हत्येचा आरोप आणि आता 28 वर्षांच्या मुलाचा न्यायालयात मोठा खुलासा
रईसच्या मृत पत्नीच्या काकांनी याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला होता. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. पुराव्यांच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाने रईसला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून रईस तुरुंगाच्या चार भिंतींच्या आड आपली शिक्षा भोगत होता. या खटल्यात रईसचा मुलगा अजीम हा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, जो घटनेच्या वेळी केवळ 5 वर्षांचा होता. उच्च न्यायालयात अपीलच्या सुनावणीदरम्यान आता 28 वर्षांच्या झालेल्या अजीमने धक्कादायक गौप्यस्फोट केला. त्याने सांगितले की, सरकारी वकील आणि तक्रारदारांच्या सांगण्यावरून त्याने तेव्हा पित्याविरोधात साक्ष दिली होती. जर त्याने त्यांचे ऐकले नसते, तर त्याला घरातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती. या खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
हेही वाचा - Amrawati Crime : मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं! चिकन खाण्याचा वाद पोहोचला टोकाला, 12 वर्षाच्या लेकाच्या मृत्यूची खोटी तक्रार आणि..., नेमकं घडलं काय?
वैद्यकीय पुरावे आणि जमीन विवादाचा अँगल
न्यायमूर्ती सिद्धार्थ आणि न्यायमूर्ती जय कृष्ण उपाध्याय यांच्या खंडपीठाने पुराव्यांची सखोल तपासणी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे दिसून आले की, जखमा कोणत्या तरी जाड धारदार शस्त्राने झाल्या होत्या, तर फिर्यादी पक्षाने त्या चाकूने केल्याचा दावा केला होता. याशिवाय, रईस आणि तक्रारदार यांच्यात जमिनीचा वाद सुरू असल्याचेही समोर आले. या विसंगतींमुळे फिर्यादी पक्षाची बाजू कमकुवत ठरली आणि रईस निर्दोष असल्याचे संकेत मिळाले.
न्यायिक व्यवस्थेवर न्यायालयाची गंभीर टिप्पणी
रईसची मुक्तता करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय फौजदारी न्याय प्रणालीवर 'दु:खद' अशी टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, रईसने आयुष्यातील 23 वर्षे तुरुंगात गमावली आहेत, जी आता कधीच परत येणार नाहीत. बाहेर आल्यावर त्याची खरी परीक्षा सुरू होईल, कारण त्याचे कुटुंब आता या जगात नाही आणि त्याचा मुलगा त्याला स्वीकारेल की नाही, याची शाश्वती नाही. न्यायव्यवस्थेत पायाभूत सुधारणांची तातडीने गरज असल्याचे न्यायालयाने ठामपणे नमूद केले. मात्र, या सर्व प्रकारानंतर रईसची पत्नी आणि त्याची तीन मुले यांची हत्या कोणी केली, हा प्रश्न आता अनुत्तरित झाला आहे.
हेही वाचा - Crime News: माता न तु वैरीण! अवघ्या दोन महिन्यांच्या लेकराला आईनेच चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं