मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. भाजपाने संकल्पपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणारी रक्कम दीड हजारांवरुन २१०० रुपये करण्याचं, तरुणाईला २५ लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन भाजपाने दिले. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावर अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांनी सूचक वक्तव्य केले. आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण निवडणुकीनंतर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून पुढील निर्णय घेतील, असे अमित शहा म्हणाले. यंदा आम्ही शरद पवारांना मुख्यमंत्री निवडण्याची संधी देणार नाही; असेही अमित शहा म्हणाले.