मुंबई : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची शासनाने नियुक्ती केली. अमोल जाधव यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी त्यांचे स्वागत केले.
मनोरंजन क्षेत्रात होणारे बदल समजून घेत महामंडळ वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील असा विश्वास जबाबदारी स्वीकारताना अमोल जाधव यांनी व्यक्त केला. नुकताच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. महामंडळदेखील भाषा, कला, साहित्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत असल्याने दर्जेदार कार्यक्रम राबविण्यावर आगामी काळात प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले. चित्रनगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. आशिया खंडातील सर्वोत्तम चित्रनगरी म्हणून दादासाहेब फाळके चित्रनगरी उदयास यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रनगरीत चित्रीकरण वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यावर जाधव यांनी चित्रनगरी परिसराची भ्रमंती करुन परिसराची माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अमोल जाधव यांचे भोर तालुका भाजयुमो सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टी जाहीरनामा उपसमिती सदस्य दत्तात्रय आनंदराव नवघणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
Amol Jadhav Vice Chairman of Maharashtra Cinema, Theater and Cultural Development Corporation