Thursday, February 12, 2026 07:35:05 PM

WhatsApp Paid Subscription : फ्री व्हॉट्सॲपचे दिवस संपले? आता स्टेटस पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे; नवीन अपडेटने खळबळ

व्हॉट्सॲप लवकरच एक 'सबस्क्रिप्शन मॉडेल' (Subscription Model) सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

whatsapp paid subscription  फ्री व्हॉट्सॲपचे दिवस संपले आता स्टेटस पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे नवीन अपडेटने खळबळ

WhatsApp Paid Subscription : आजच्या काळात प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप (WhatsApp) हे अनिवार्य अ‍ॅप बनले आहे. मात्र, आतापर्यंत मोफत सेवा देणारे हे प्लॅटफॉर्म लवकरच आपले स्वरूप बदलण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲप लवकरच एक 'सबस्क्रिप्शन मॉडेल' (Subscription Model) सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मेसेज करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, तर हे बदल प्रामुख्याने व्हॉट्सॲपच्या 'स्टेटस' (Status) फिचरसाठी असतील.

व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये जाहिरातींची एन्ट्री

विविध रिपोर्ट्स आणि व्हॉट्सॲपच्या नवीन बीटा आवृत्ती (2.26.3.9) मधील कोडच्या तपासणीनुसार, कंपनी स्टेटस टॅबमध्ये जाहिराती दाखवण्यावर काम करत आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीमध्ये जशा जाहिराती दिसतात, तशाच प्रकारे आता व्हॉट्सॲप स्टेटस पाहतानाही जाहिरातींचा सामना करावा लागू शकतो. वापरकर्त्यांच्या विरोधानंतरही व्हॉट्सॲप या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत असून, जाहिराती टाळण्यासाठी कंपनी 'पेड ॲड-फ्री सबस्क्रिप्शन' हा पर्याय देऊ शकते.

हेही वाचा - Sanpchat Update : मोठी अपडेट! पालक आता ठेऊ शकणार मुलांच्या स्नॅपचॅटवर करडी नजर

काय असेल पेड सबस्क्रिप्शन मॉडेल?

अनेकांना प्रश्न पडला आहे की व्हॉट्सॲपसाठी पैसे का द्यायचे? याचे उत्तर स्टेटस फिचरमध्ये दडलेले आहे. ज्या वापरकर्त्यांना आपल्या स्टेटस फीडमध्ये कोणत्याही जाहिराती नको आहेत, त्यांना विशिष्ट शुल्क भरून सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. जे वापरकर्ते पैसे देणार नाहीत, त्यांना स्टेटस पाहताना मधूनच जाहिराती दिसतील. मेसेजिंग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहण्याची शक्यता असली, तरी स्टेटसचा अनुभव मात्र आता विनामूल्य राहणार नाही.

व्हॉट्सॲप बिझनेस युजर्सना होणार फायदा

व्हॉट्सॲप बिझनेस वापरकर्त्यांसाठी ही एक मोठी संधी असू शकते. सध्या व्यावसायिक युजर्स त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती फेसबुक आणि इंस्टाग्रामवर करतात. मात्र, नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल लागू झाल्यानंतर, या जाहिराती थेट नियमित व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या स्टेटस टॅबमध्ये दिसू शकतील. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल, परंतु सामान्य वापरकर्त्यांसाठी हा अनुभव काहीसा त्रासदायक ठरू शकतो.

कधीपासून लागू होणार नवीन नियम?

व्हॉट्सॲपने अद्याप या सबस्क्रिप्शन मॉडेलची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. ही माहिती सध्या केवळ बीटा व्हर्जनच्या कोडमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे हे फिचर लगेचच उपलब्ध होणार नसले, तरी भविष्यात जाहिरातमुक्त व्हॉट्सॲपसाठी खिशातून पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे, हे स्पष्ट होत आहे. 


सम्बन्धित सामग्री