Durga Saptashati Pathan: हिंदू धर्मात शारदीय नवरात्र हा सण दुर्गा देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये भाविक दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात आणि उपवास करतात. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या पाठाचे पठण करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दुर्गा सप्तशती पठण का महत्त्वाचे आहे?
दुर्गा सप्तशतीलाच देवी महात्म्य असेही म्हणतात. या ग्रंथात दुर्गा देवीचा महिमा, तिचे शौर्य आणि राक्षसांवर मिळवलेल्या विजयाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे.
शांतता आणि सकारात्मकता: या पाठाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते, जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबात आनंद व शांतता येते.
अडचणींवर विजय: जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी हे पठण अत्यंत प्रभावी मानले जाते.
पठणाची योग्य वेळ आणि ठिकाण
तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण सकाळच्या वेळी (सूर्योदयानंतर) किंवा संध्याकाळी करू शकता.
शुभ वेळ: नवरात्रीत हे पठण करणे विशेषतः शुभ मानले जाते. तथापि, तुम्ही वर्षभर कधीही हे पठण करू शकता; पण त्यात सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.
ठिकाण: दुर्गा सप्तशतीचे पठण घरी मंदिरात किंवा कोणत्याही शांत आणि स्वच्छ ठिकाणी करावे. देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर धूप आणि दिवा लावून मगच पठण सुरू करावे.
हेही वाचा - Shardiya Navratri 2025: माता दुर्गा आणि लक्ष्मीला प्रसन्न करून मिळवा सुख-समृद्धी! धनप्राप्तीसाठी करा हे सोपे उपाय
पठण करताना पाळावयाचे महत्त्वाचे नियम
पठण करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्याचे संपूर्ण फळ मिळते:
- योग्य आसन: शांत स्थितीत पठण करा. गादीवर, आसनावर किंवा स्वच्छ कापडावर बसणे शुभ मानले जाते. मन आणि शरीर दोन्ही शांत ठेवून भक्तीने पठण करावे.
- संकल्प आणि पूर्णता: दुर्गा सप्तशती वाचन सुरू करण्यापूर्वी ते वाचण्याची सुरुवात करण्याचा आणि पूर्ण करण्याचा संकल्प करा.
- एकाग्रता: पठण करताना मधे-मधे इतरांशी बोलू नका. तुमचा मोबाईल फोन वापरून किंवा इतर गोष्टींनी विचलित होऊ नका. पठणादरम्यान शब्दांचे योग्य उच्चार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नक्की प्रयास करा. परंतु, त्याहीपेक्षा अधिक आपल्या मनातील भाव महत्त्वाचे आहेत.
- शुद्ध सात्विक आहार, विहार, आचार-विचारांचा प्रभाव : दुर्गा सप्तशती पठण करताना शुद्ध सात्विक आहार, विहार, आचार-विचारांचा खूप चांगला प्रभाव पडतो. यामुळे मातेची कृपा स्वीकारण्यास आपण अधिकाधिक पात्र होतो. यामुळे केलेल्या धार्मिक कर्माचा परिणाम आणखी जास्त होतो.
दुर्गा मंत्र पठण
ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा।
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति।।
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि।
दारिद्र्य दुःख भयहारिणि का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता।।
सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते॥
शरणागत दीनार्तपरित्राण परायणे
सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोस्तु ते॥4॥
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोस्तु ते॥
रोगानशेषानपंहसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान्।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता हि आश्रयतां प्रयान्ति॥
सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि।
एवमेव त्वया कार्यम् अस्मद् वैरि विनाशनम्॥
हेही वाचा - Sadetin Shakti Peeh : ही आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं; जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)