Tuesday, February 17, 2026 08:23:40 PM

Bank Unions Nationwide Strike : सरकारबरोबरची चर्चा निष्फळ! 27 जानेवारीला 10 लाख बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; काय आहे मागणी?

या संपामुळे देशातील 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही जुन्या पिढीतील खासगी बँकांच्या कामकाजावर परिणाम होईल. यादरम्यान, ऑनलाईन व्यवहारांचा वापर करण्याचे आवाहन बँकांनी केले आहे.

bank unions nationwide strike  सरकारबरोबरची चर्चा निष्फळ 27 जानेवारीला 10 लाख बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप काय आहे मागणी

Bank Unions Nationwide strike : येत्या मंगळवारी, 27 जानेवारी 2026 रोजी देशभरातील बँकिंग सेवांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 5 दिवसांचा कामकाजाचा आठवा लागू करण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. विशेष म्हणजे, शनिवारपासूनच बँकांना सलग सुट्ट्या सुरू झाल्या आहेत.
24 जानेवारी: चौथा शनिवार (सुट्टी)
25 जानेवारी: रविवार (सुट्टी)
26 जानेवारी: प्रजासत्ताक दिन (सुट्टी)
27 जानेवारी: बँक संप

12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर परिणाम
या संपामुळे देशातील 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही जुन्या पिढीतील खासगी बँकांच्या कामकाजावर परिणाम होईल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांसारख्या प्रमुख बँकांनी स्टॉक एक्सचेंजला या संपाबाबत आधीच सूचित केले आहे. संपाच्या दिवशी शाखांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी बँकांनी आवश्यक व्यवस्था केली असली, तरी ग्राहकांना व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात, असा इशाराही बँकांनी दिला आहे.

बँक युनियन्सची मुख्य मागणी
UFBU अंतर्गत येणाऱ्या 9 विविध संघटनांनी हा संपाचा निर्णय घेतला आहे. त्यांची प्रमुख मागणी खालीलप्रमाणे आहे:
सर्व शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करून '5 दिवसांचा बँकिंग आठवडा' सुरू करावा.
या बदल्यात कर्मचारी सोमवार ते शुक्रवार दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), LIC आणि GIC यांसारख्या संस्थांमध्ये आधीच 5 दिवसांचा आठवडा लागू आहे, मग बँकांना का नाही? असा सवाल युनियनने उपस्थित केला आहे.

हेही वाचा - EPFO Members Bonus: PF खातेधारकांसाठी गुड न्यूज, व्याजाचे पैसे जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात किती रुपये येणार? 'असे' तपासा

बँक कर्मचाऱ्यांची भूमिका
AIBEA चे सरचिटणीस सी.एच. व्यंकटचलम यांनी स्पष्ट केले की, सर्व शनिवारी सुट्टी दिल्याने कामाच्या तासांचे कोणतेही नुकसान होणार नाही. परकीय चलन बाजार, शेअर बाजार आणि मनी मार्केट आधीच शनिवारी बंद असतात. तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयांनाही शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातही हा बदल करणे तर्कसंगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते 27 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हा संप सुरू राहील.

ग्राहकांसाठी सतर्कतेचा इशारा
सलग सुट्ट्यांमुळे आणि त्यानंतरच्या संपामुळे बँकांच्या एटीएममधील (ATM) रोकड संपण्याची दाट शक्यता आहे. तसेच चेक क्लिअरन्स आणि शाखेतील इतर व्यवहारांसाठी ग्राहकांना बुधवारपर्यंत वाट पाहावी लागू शकते. यादरम्यान बँकांनी आपल्या ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या संपामुळे अर्थव्यवस्थेच्या गतीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Expected Changes Budget 2026: कष्टाच्या कमाईवर आता कमी टॅक्स; बजेटमध्ये नोकरदारांच्या 'या' प्रमुख मागण्या पूर्ण होणार?


सम्बन्धित सामग्री