Friday, March 13, 2026 07:27:17 AM

IDFC FIRST बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा! सरकारी खात्यांमधील कोट्यवधी रुपये गायब; कर्मचाऱ्यांनीच...

हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून रक्कम दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याची विनंती केली होती. जेव्हा बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा हा घोटाळा झाल्याचे समोर आले.

idfc first बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा सरकारी खात्यांमधील कोट्यवधी रुपये गायब कर्मचाऱ्यांनीच

IDFC First Bank Fraud : बँकिंग क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. IDFC FIRST बँकेच्या चंदीगड शाखेत तब्बल 590 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असून, या फसवणुकीने सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे. हा घोटाळा प्रामुख्याने हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्या खात्यांशी संबंधित आहे. बँकेने यासंदर्भात 'सेबी'ला (SEBI) अधिकृत माहिती दिली असून, सामान्य ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

असा उघड झाला 590 कोटींचा 'झोल'
या मोठ्या फसवणुकीचा खुलासा 18 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून रक्कम दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याची विनंती केली होती. जेव्हा बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा विभागाच्या नोंदीतील शिल्लक रक्कम आणि बँकेच्या सिस्टममधील वास्तविक बॅलन्स यामध्ये मोठी तफावत आढळली. संशय बळावल्याने इतर सरकारी खात्यांचीही तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये आतापर्यंत एकूण 590 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - SC on Consumer Rights: बिल्डरांचा डाव फसला; घर खरेदीदारांना 'सर्वोच्च' दिलासा, 'फ्लॅट भाड्याने दिला म्हणजे तुम्ही 'व्यापारी' होत नाही!'

कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि बँकेची कारवाई
प्राथमिक तपासानुसार, बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्ती किंवा संस्थांशी हातमिळवणी करून सरकारी निधी वळवला आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेत बँकेने संशयास्पद भूमिका असलेल्या 4 बँक अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे. बँकेने पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली असून, दोषींविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी खटले चालवण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या संशयास्पद खात्यांमध्ये हा निधी वळवण्यात आला होता, ती खाती गोठवण्यासाठी (Freeze) संबंधित बँकांना विनंती पाठवण्यात आली आहे.

फॉरेंसिक ऑडिट आणि पुढील पावले
घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन 20 आणि 21 फेब्रुवारी 2026 रोजी बँकेच्या बोर्ड आणि ऑडिट कमिटीची आपत्कालीन बैठक पार पडली. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी बँकेने एका स्वतंत्र बाह्य एजन्सीमार्फत 'फॉरेंसिक ऑडिट' (Forensic Audit) सुरू केले आहे. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन बँकेने दिले असून, कायदेशीर प्रक्रियेद्वारे हा निधी वसूल करण्यावर भर दिला जात आहे. ही एक विशिष्ट घटना असून तिचा परिणाम बँकेच्या इतर सामान्य कामकाजावर होणार नाही, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा - GST Notice to Potter : ऐकावं ते नवलंच! मडकी घडवणाऱ्याला धाडली तब्बल एक कोटीची GST नोटीस, कुटुंबाला मोठा धक्का, नेमका प्रकार काय?


सम्बन्धित सामग्री