Saturday, January 25, 2025 08:38:49 AM

Kurla best bus Current Situation Update
कुर्ल्यात बेस्ट बसने अनेक वाहनांना उडवलं ; सध्या परिस्थिती काय ?

कुर्ल्यात बेस्ट बसने अनेक वाहनांना उडवलं  सध्या परिस्थिती काय
कुर्ल्यातील अपघाताची आताची मोठी अपडेट

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस.जी. बारवे मार्गावर ९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९:५० वाजता बेस्ट बसने रस्त्यावर असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये २ पोलीस कर्मचारी, एक MSF जवान आणि इतर नागरिकांचा समावेश आहे. बेस्ट बसने रस्त्यावर काही वाहनांना धडक दिली, ज्यामुळे मोठा अपघात घडला. अपघातानंतर, अनेक जणांना उपचारासाठी कुर्ला भाभा रुग्णालय, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. कुर्ला भाभा रुग्णालयाच्या डॉ. पद्मश्री अहिरे यांच्या माहितीप्रमाणे, ३५ जण जखमी झाले आहेत, त्यामध्ये २ जण मृत आणले गेले आणि २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोहिनूर हॉस्पिटलच्या डॉ. एजाज खान यांनी ३ जखमींमध्ये १ मृत्यू आणि २ गंभीर जखमी असल्याची माहिती दिली. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या डॉ. सभ्यता यांनी ४ पोलीस कर्मचार्‍यांच्या जखमी होण्याची माहिती दिली, त्यांची स्थिती स्थिर आहे. सिटी हॉस्पिटल, कुर्लाचे डॉ. गुलाम हुसैन यांच्या अनुसार, उमेर अब्दुल गफुर (वय ३५ वर्षे) यांची स्थिती अद्याप गंभीर आहे. संपूर्ण रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरु आहेत. 

आरोपी बस चालक संजय मोरे याला अटक
पोलिसांनी आरोपी बस चालक संजय मोरे (वय ५४) याला अटक केली आहे. संजय मोरे हा अनेक वर्षे बेस्ट बस चालक आहे आणि त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती
घटना रात्री ०९.४५ वाजता कुर्ला पश्चिम मार्केट, एस.जी. बारवे मार्ग येथे घडली. बस साकिनाका कडे जात असताना चालकाने गाडीवर नियंत्रण गमावले आणि वेगाने अपघात झाला. या अपघातात २०-२५ वाहनं, जसे की ऑटो रिक्षा, दुचाकी, इको व्हॅन, पोलीस जीप, टॅक्सी इत्यादींचे नुकसान झाले.

कुर्ला बसस्थानक बेस्ट बसेसचे मार्ग बदलले
बुद्ध कॉलनी येथे रात्री झालेल्या अपघातामुळे पोलिसांनी कुर्ला स्टेशन बंद केल्याने, बस मार्ग ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ हे मार्ग कुर्ला आगारातून सुरू राहतील. तसेच, सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बस मार्ग ३११, ३१३ आणि ३१८ च्या बसेस टिळक नगर येथून वापस वळण घेऊन कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रुझ स्टेशन जातील. बस मार्ग ३१० च्या बसेसही टिळक नगर पुलावर वरून वळण घेऊन बांद्रा बस स्थानकाला जातील.

घटना स्थळी बेस्ट अधिकारी उपस्थित
बेस्ट ट्रॅफिक मॅनेजर आणि आगार अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ही घटना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा कारण ठरली असून, घटनास्थळी पोलिसांची कडेकोट बंदोबस्त आहे.


सम्बन्धित सामग्री