मुंबई : शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचे सूतोवाच केले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होणं आवश्यक आहे आणि 11 ते 12 तारखेला विस्तार होईल, अशी गोगवलेंची अपेक्षा आहे. 16 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे, त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित आहे.
उपमुख्यमंत्री पदाची जाहीरात आणि सस्पेन्स
उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव उशिरा जाहीर झालं. यावर बोलताना आमदार गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. "मी सत्तेबाहेर राहून काम करेल' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, आणि एकनाथ शिंदे देखील तेच म्हणत होते," असं गोगावले यांनी सांगितले. त्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस उपमुख्यमंत्री होताना काहीतरी वाटणारच, असं सूचित करत, "आम्ही सर्वांनी त्यांची मनधरणी केली आणि ते तयार झाले," असे ते म्हणाले. गोगावले यांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात, नाहीतर असं वाटायला नको की नाव घेतलं आणि लगेच तयार झाले. "हा सस्पेन्स आम्ही दुपारी संपवला," असं ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू असून, लवकरात लवकर विस्तार होण्याची आवश्यकता असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "16 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराचे काम अधिवेशनापूर्वी पूर्ण व्हायला हवे." राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयामुळे चर्चेचे विषय बनले आहेत.