Wednesday, February 12, 2025 02:07:22 AM

BHIWANDI BUS STAND NEWS
भिवंडी एस.टी. बसस्थानकाची दुरावस्था : प्रवाशांचे जीवन धोक्यात

भिवंडी एस.टी. बसस्थानकाची दुरावस्था आणि नूतनीकरणाची आवश्यकता

भिवंडी एसटी बसस्थानकाची दुरावस्था  प्रवाशांचे जीवन धोक्यात

मुंबई : भिवंडी एस.टी. बसस्थानकाच्या (आगार) दुरावस्थेमुळे प्रवाशांचे जीवन धोक्यात येत आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांमधील खड्डे भरण्याचे काम नुकतेच सुरु झाले आहे. तथापि, ही केवळ तात्पुरती डागडुगी असून, भिवंडी एस.टी. बस स्थानकाची संपूर्ण उभारणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

भिवंडी आगाराची उभारणी १९७२ साली झाली असून, याची मूळ इमारत आता ५२ वर्षे जुनी झाली आहे. या इमारतीच्या जुन्या अवस्थेमुळे ती धोकादायक बनली आहे. आता इमारतीच्या काही खिडक्या तुटल्या आहेत, तर काही ठिकाणी प्लास्टरही निघालं आहे. स्थानकाच्या रांगेत उभे राहण्यासाठी ठाणे-कल्याणच्या फलाटाचे लोखंडी पाईप तुटले असून, त्या ठिकाणी रांग लावणेही कठीण झाले आहे. अनेक वेळा प्रवाशांना इमारतीबाहेर उन्हात किंवा पावसात उभे करून बसमध्ये बसवले जाते.

स्थानकाच्या कॅन्टीनमध्ये प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा होत नाही, आणि शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. महिलांकडून लघु शंकेसाठी पैसे घेतले जातात, हे देखील गंभीर समस्या आहेत.

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे आगाराच्या परिसरात खड्डे पडतात, पण त्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाणी प्रवाहित करण्यासाठी मार्ग शोधला जात नाही, परिणामी दरवर्षी हा समस्या सतत वाढत आहे.

सध्या, महामंडळाच्या ठाणे विभागाने आगारातील खड्ड्यांची दुरुस्ती सुरु केली आहे. यासाठी काही ठिकाणी जुने पेव्हर ब्लॉक काढून त्यांची जागा नवीन ब्लॉक लावून दुरुस्ती केली जात आहे. तथापि, वारंवार अशा दुरुस्त्या होण्यापेक्षा या आगाराचे संपूर्ण नूतनीकरण गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी या आगाराच्या नूतनीकरणासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. पीपीपी तत्वावर शासनाने या नूतनीकरणाचे ठरवले होते, पण त्यावर ठोस कार्यवाही होणे आवश्यक आहे.

👉👉 हे देखील वाचा : "कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी; मुलाच्या आत्महत्येनंतर पिता देखील गळफास घेतो"

भिवंडी हे औद्योगिक शहर आहे आणि येथून एस.टी. बस ही रेल्वे स्थानक गाठण्यासाठी एक महत्त्वाचे सार्वजनिक वाहतूक साधन आहे. त्यामुळे, भिवंडी आगाराचे प्रथम नूतनीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी नव्या सरकारात असलेल्या मंत्र्यांनी या समस्येवर लक्ष केंद्रित करून प्रयत्न केले पाहिजे.

सध्या भिवंडी आगारातून दररोज १० ते १२ हजार प्रवासी प्रवास करतात. आगारात एकूण ६० बसेस आहेत, ज्यापैकी अनेक गाड्या सीएनजी चालविणार्या आहेत. शासनाकडून १६ नवीन बसेस येण्याची माहिती मिळाली आहे. सध्याच्या गाड्यांसाठी आगारात २५० चालक-वाहक कार्यरत आहेत, तर ५० इतर कर्मचारी देखील काम करत आहेत.

भिवंडी आगारातून कल्याण व वाडा या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामध्ये भिवंडी-वाडा मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे बसेसचे नुकसान होत असून, खड्ड्यामुळे काही गाड्यांचे पार्ट्स देखील तुटत आहेत. परिणामी शासनाला मोठा खर्च सहन करावा लागतो. तसेच, कर्मचाऱ्यांना देखील शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे, शासनाच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यावर त्वरित लक्ष देऊन या नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती केली पाहिजे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री