Pension Proposal for Central Employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित आणि मोठी मागणी अखेर पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) आणि एकात्मिक पेन्शन योजना (UPS) या दोन्ही अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'लाईफ सायकल' (Life Cycle) आणि 'बॅलन्स्ड लाईफ सायकल' (Balanced Life Cycle) या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियोजनातील लवचिकता वाढावी आणि त्यांना त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करता यावे, यासाठी हे पर्याय तयार करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की, त्यांनाही गैर-सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध व्हावेत.
उपलब्ध पर्याय आणि गुंतवणूक पद्धती
NPS आणि UPS अंतर्गत, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. यापूर्वी 'स्कीम-जी' हा पर्याय होता, ज्यात कमी धोका आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी 100 टक्के गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते. तसेच, पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) वेळोवेळी परिभाषित केलेला एक 'डिफॉल्ट पॅटर्न' देखील डिफॉल्ट पर्याय म्हणून उपलब्ध होता. NPS ची सुरुवात 2004 मध्ये झाली, तर UPS ला केंद्र सरकारने 2004 मध्येच मंजुरी दिली आणि ती एप्रिल 2025 पासून लागू झाली.
हेही वाचा - Emergency Financial Options: अचानक पैशाची गरज पडली तर...? ओव्हरड्राफ्ट, वैयक्तिक कर्ज की क्रेडिट कार्ड? कोणता पर्याय सर्वोत्तम
'लाईफ सायकल' पर्यायातील तपशील
नवीन 'लाईफ सायकल' (LC) पर्यायांमध्ये कर्मचाऱ्यांच्या गरजांनुसार अनेक उप-पर्याय दिले आहेत. उदा. LC-25 पर्यायाखालील कमाल इक्विटी वाटप (Equity Allotment) 25 टक्के आहे, जे कर्मचाऱ्याच्या 35 वर्षांच्या वयापासून 55 वर्षांच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते. अधिक इक्विटीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी LC-75 पर्याय आहे, ज्यात कमाल इक्विटी वाटप 75 टक्के ठेवले आहे आणि तेही 35 ते 55 वर्षांदरम्यान हळूहळू कमी होते.
बॅलन्स्ड लाईफ सायकल (BLC) पर्यायाचे फायदे
याशिवाय, 'बॅलन्स्ड लाईफ सायकल' (BLC) पर्याय हा LC-50 (ज्यात कमाल इक्विटी 50 टक्के आहे) ची सुधारित आवृत्ती आहे. BLC पर्यायामध्ये इक्विटी वाटप कमी होण्यास 45 वर्षांच्या वयापासून सुरुवात होते, ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते आणि त्याचा फायदा मिळू शकतो.
हेही वाचा - SEBI Mutual Fund Reforms: सेबीचा मोठा निर्णय ; गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठे बदल