Gautami Patil Gets Clean Chit: पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी वडगाव पुलाजवळ एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघाताच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला 'क्लीन चीट' दिली आहे. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत उपस्थित नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी झालेल्या या अपघातात रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षातील अन्य दोघेही जखमी असून ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे. तथापी, रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलच्या टीमवर गंभीर आरोप केले होते. एवढा मोठा अपघात होऊनही तिच्याकडून साधी चौकशी किंवा संदेशही आला नाही. तसेच पोलिसांनीही सहकार्य केले नाही, असे त्यांचे म्हणणे होते. या आरोपांनंतर सिंहगड पोलीस स्टेशनसमोर आंदोलनही करण्यात आले होते.
हेही वाचा - Ban on Flying Lanterns : आता ड्रोन, आकाश कंदील उडवल्यास होईल कारवाई; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केले निर्बंध जारी
सीसीटीव्ही तपासणीनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण
अपघातानंतर राजकीय दबाव वाढला होता. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी कारवाईसाठी पोलिसांना फोन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि कार चालकाचे वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीतून पोलिसांना अपघात कार चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही आणि अन्य चौकशीमध्ये गौतमी पाटील अपघाताच्या वेळी कारमध्ये नव्हती. त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Weather Forecast : कोकणासह 'या' भागांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती
याशिवाय, कुटुंबीयांच्या आरोपानंतर आणि आंदोलनानंतर पोलिसांनी या अपघात प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. तथापी, आता कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत आहेत.