Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात सध्या वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या राखी सावंतने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एरवी आपल्या 'नागिण' अवताराने सर्वांची वाट लावणारी राखी पहिल्यांदाच ढसाढसा रडताना दिसली. या भावनिक उद्रेकामागे कारण आहे ड्रामाक्वीन राखीच्या डोक्यात शिजणारी कारस्थाने. राखीने प्रभू आणि तन्वीच्या मैत्रीत फूट पाडल्यानंतर, प्रभूला रडताना पाहून ती स्वतःही अश्रू ढाळत आहे. मात्र, राखीला चांगले ओळखणाऱ्यांना हे 'नागिन के आसूं' वाटल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र नक्की..
मैत्रीत टाकला मिठाचा खडा
बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये राखी सावंत आपला 'माइंड गेम' खेळताना दिसत आहे. तिने प्रभू आणि तन्वी कोलते यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला लक्ष्य केले. राखीने प्रभूला भडकवताना म्हटले की, "तू इथे कोणाचा पदर धरून फिरायला आलेला नाहीस, स्वतःसाठी खेळ." राखीच्या या विधानामुळे प्रभू आणि तन्वीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या तन्वीनेही प्रभूला सुनावले की, "जर तुला वाटत असेल तू माझा पदर पकडून फिरतोस, तर उद्यापासून माझ्या मागे येऊ नकोस."
प्रभूला पडली मिठी आणि राखी रडली
तन्वीने साथ सोडल्यानंतर प्रभू शेळके पूर्णपणे कोलमडून गेला. तो हताश होऊन राखीजवळ गेला. यावेळी राखीने प्रभूला जवळ घेतले आणि त्याला मिठी मारून ती स्वतः ढसाढसा रडू लागली. "सॉरी, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही," असे म्हणत राखीने आपल्या भावना व्यक्त केल्या. रडताना तिचा आवाजही बसलेला जाणवत होता. राखीचे ऐकून तन्वीपासून दूर गेलेला प्रभू एकटा पडलेला होता. त्याला आता राखीनेही त्याच्यासाठी काही करू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यालाही अश्रू अनावर झाले आणि तो सोफ्यावर मान खाली घालून रडत राहिला.
हेही वाचा - The 50 Winner : 'लायन'च्या महालात मराठमोळा डंका! 'द 50' शोचा पहिला विजेता ठरला शिव ठाकरे?
तन्वीचा 'केसाने गळा' कापला?
विशेष म्हणजे, काही काळापूर्वीच तन्वीने प्रभूला सांगितले होते की तिला राखीमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसते आणि राखी खूप चांगली आहे. मात्र, ज्या राखीचे तन्वीने कौतुक केले, त्याच राखीने तन्वी आणि प्रभूच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकला. राखीने प्रभूला पटवून दिले की तन्वी फक्त तिचा कॅप्टन्सीचा कार्यकाळ सुसह्य करण्यासाठी त्याचा वापर करत आहे. या 'ट्रँगल'मुळे घरातील गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
राखीची एक्झिट की नवा ट्विस्ट?
एकीकडे राखीचा हा भावनिक चेहरा दिसत असतानाच, दुसऱ्या एका प्रोमोमध्ये बिग बॉस तिच्यावर प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे. घरातील तोडफोड आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आले असून, तिला घराबाहेर काढले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - M M Baig Death : धक्कादायक! राहत्या घरात ज्येष्ठ दिग्दर्शकाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत; चार दिवसांनी उघडकीस आली घटना