Bihar Exit Poll: बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा संपल्यानंतर संपूर्ण राज्यात आता उत्सुकता आहे ती मतमोजणीच्या दिवसाची. दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून, मतदान संपताच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या अंदाजांनुसार पुन्हा एकदा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात एकूण 243 जागांपैकी दुसऱ्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान पार पडले. मंगळवारी झालेल्या मतदानात तब्बल 67 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, जो बिहारच्या निवडणूक इतिहासातील सर्वाधिक मतदान दर ठरला आहे. त्यामुळेच, हे विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने झुकते आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?
MATRIZE–IEANS या संस्थेच्या एक्झिट पोल अहवालानुसार, एनडीएला या निवडणुकीत सुमारे 48 टक्के मते मिळू शकतात. तर, इंडिया आघाडी (महागठबंधन) ला 37 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जागांच्या आकड्यांवर नजर टाकल्यास एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागांदरम्यान मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
जर हे अंदाज खरे ठरले, तर नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारच्या गादीवर बसतील. परंतु तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन मात्र या अंदाजावर नाराजी व्यक्त करत असून, 'खरा निकाल 14 नोव्हेंबरलाच दिसेल,' असं त्यांनी म्हटलं आहे.
स्पर्धा ‘कांटे की’च!
या निवडणुकीत दोन्ही प्रमुख आघाड्यांनी प्रचंड मेहनत घेतली. एनडीएकडून भाजप (BJP) चे 53, तर जनता दल (युनायटेड) चे 44 उमेदवार रिंगणात होते. दुसरीकडे, इंडिया आघाडीकडून आरजेडी (RJD) चे 71 आणि काँग्रेसचे 37 उमेदवार निवडणूक लढवत होते. एकूण 3.7 कोटींहून अधिक मतदारांनी आपले मतदान करून बिहारच्या भविष्यासाठी कौल दिला आहे.
नितीशकुमार की तेजस्वी यादव?
या निवडणुकीतला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बिहारच्या जनतेला पुन्हा अनुभवाचा हात हवेय का, की नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहेत? नितीशकुमार हे सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत, तर तेजस्वी यादव तरुण नेतृत्व म्हणून उभे राहिले आहेत.
मतमोजणी निर्णायक ठरणार
आता सगळ्यांचे लक्ष 14 नोव्हेंबरकडे लागले आहे, कारण याच दिवशी मतमोजणी होणार आहे. तेव्हाच ठरेल की एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात आणि बिहारच्या राजकारणाचा पुढचा अध्याय कोणाच्या नावावर लिहिला जाणार आहे.