बिहार विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्यानंतर आता प्रतिक्षा आहे ती मतमोजणीची. मतमोजणी शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी होणार असून एनडीए म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी इंडिया आघाडी या दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. निकाल ठरवून देईल की जनता जनता दल यूनायटेडचे नेते आणि राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांना सलग पाचव्या कार्यकाळाची संधी देणार की बदलाची दिशा निवडणार. निवडणुकीनंतर प्रकाशित झालेल्या बहुतेक सर्व्हेंनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी विजय सोहळ्यासाठी मिठायांच्या मोठ्या ऑर्डर देण्यात आल्याची माहिती मिळते. दुसरीकडे विरोधी इंडिया आघाडीत अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, रोहतास जिल्ह्यात ईव्हीएमबाबत अफवा पसरल्याने काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. रोहतासच्या जिल्हाधिकारी उदिता सिंह यांनी सांगितले की गुरुवारी संध्याकाळी ईव्हीएम मशीनने भरलेला ट्रक बाजार समिती परिसरात घुसल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. मात्र तपासात समोर आले की रात्री 7 वाजून 59 मिनिटांनी जे ट्रक परिसरात होते, ते खरं तर रिकाम्या स्टीलच्या पेट्यांनी भरले होते. उपस्थित उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि समर्थक यांच्या समोर सर्व पेट्या उघडून पाहण्यात आल्या आणि त्या पूर्णपणे रिकाम्या निघाल्या. त्यामुळे ईव्हीएम बदलल्याच्या अफवा निराधार असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा: Money Laundering Case : ED ची मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगप्रकरणी JP इन्फ्राटेकचे एमडी अटकेत
बिहार निवडणुकीवर जेडीयूचे नेते नीरज कुमार म्हणाले की मतमोजणीचा दिवस जाहीर असून जनतेने स्पष्टपणे एनडीएला मत दिलं आहे. जनता तेजस्वी यादव यांना सत्तेवर बसवणार नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या मते एनडीएला मोठा विजय मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पटणा येथे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू होईल. सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा आणि देखरेख वाढवण्यात आल्याचेही सांगितले गेले आहे.
काँग्रेस नेते राजेश ठाकूर यांनी विश्वास व्यक्त केला की निकालानंतर 24 तासांच्या आत स्पष्ट ट्रेंड दिसू लागतील आणि इंडिया आघाडीच सरकार स्थापन होईल. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना मतमोजणीदरम्यान पूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. ठाकूर यांच्या मते, तेजस्वी यादव हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री होतील, असा पक्षाचा ठाम विश्वास आहे. या निकालाने बिहारच्या भवितव्याचा मार्ग निश्चित होणार असून राज्याची राजकीय हवा कोणत्या दिशेने वळणार यावर सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा: Assam Police Action: दिल्ली स्फोटावर थट्टा केल्याप्रकरणी आसाममध्ये 15 जणांना अटक