मुंबई : नेता निवडीसाठी भाजपाची मंगळवार 3 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या बैठकीनंतर गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. शपथविधीबाबतची माहिती महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करुन दिली आहे. भाजपाचा मुख्यमंत्री तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री तसेच प्रत्येकी सहा आमदारांमागे एक मंत्री असे महायुतीच्या सत्तास्थापनेचे सूत्र ठरले असल्याचेही समजते.
शिवसेनेने एकनाथ शिंदेंची तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांची नेतेपदी एकमताने निवड केली आहे. भाजपाची नेता निवडीची बैठक मंगळवारी होईल, असे सूत्रांकडून समजते. भाजपाची नेता निवड व्हायची आहे. पण देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. यामुळे शपथविधी सोहळा राजभवनाऐवजी आझाद मैदानावर घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. अद्याप या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. याआधी शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी होईल अशी चर्चा होती. पण महायुतीचे अनेक नेते शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी घेऊ नये या मताचे असल्याचे समजते. याआधी 1995 मध्ये युती सरकारचा आणि 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी शिवाजी पार्क मैदानावर झाला होता. पण दोन्ही सरकारांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामुळे शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी घेऊ नये असे महायुतीतल्या अनेक नेत्यांचे मत असल्याचे समजते.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.