Saturday, March 07, 2026 01:39:01 AM

Car Fire : 'बर्निंग कार'चा थरार! धावत्या गाडीत अचानक भडका, भाजप खासदाराची आलिशान रेंज रोव्हर जळून खाक

आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरल्या की, बघता बघता कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर कार पूर्णपणे जळून खाक झाली. या भीषण आगीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती.

car fire  बर्निंग कारचा थरार धावत्या गाडीत अचानक भडका भाजप खासदाराची आलिशान रेंज रोव्हर जळून खाक

Nashik Car Fire: भाजप खासदाराच्या धावत्या आलिशान रेंज रोव्हर कारला अचानक भीषण आग लागली. काही वेळातच या आगीने इतके रौद्र रूप धारण केले की, कोट्यवधी रुपयांची ही कार जळून खाक झाली. शुक्रवारी, 13 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही कार नाशिकजवळील गोंदे फाटा परिसरातून जात असताना ही धक्कादायक घटना घडली. 

त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जात असताना अपघात
मुंबई-नाशिक महामार्गावर एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हे भाजप खासदार राजस्थानमधील असून त्यांचे नाव लुंबाराम चौधरी आहे. ते आपल्या सहकाऱ्यांसह वाशिम येथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील रेंज रोव्हर कार (क्रमांक MH 01 DK 9975) मधून ते प्रवास करत होते. ही कार शहापूर येथील चालक अनिल बबन जाधव (वय 40) हे चालवत होते. त्यांनाच सर्वात प्रथम गाडीत काहीतरी वेगळेच जाणवत असल्याची शंका आली.

चालकाचे प्रसंगावधान आणि खासदारांची सुटका
कार धावत असताना अचानक इंजिनमधून काहीतरी जळाल्याचा तीव्र वास येऊ लागला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. कारला आग लागल्याचे दिसताच अनिल जाधव यांनी खासदार चौधरी आणि इतर सहकाऱ्यांना तातडीने गाडीतून खाली उतरवले. खासदार आणि त्यांचे सहकारी खाली उतरताच काही सेकंदातच आगीने भीषण रूप धारण केले. जर चालकाने वेळीच गाडी थांबवली नसती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने, चालक जाधव यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा - Mumbai Metro Accident : मुलुंड येथे मेट्रो 4 प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, चार जण जखमी, एक गंभीर

काही मिनिटांत कारचा झाला कोळसा
आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरल्या की, बघता बघता कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच वाडीवरे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत गाडीचा केवळ सांगाडाच उरला होता. या भीषण आगीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
प्राथमिक तपासानुसार, कारला आग लागण्याचे कारण इंजिनमधील शॉर्ट सर्किट असल्याचे वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. खासदार लुंबाराम चौधरी सुखरूप असल्याची बातमी मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी आणि कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वाडीवरे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, महामार्गावरील अशा घटनांमुळे वाहनांच्या मेंटेनन्सबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा - Video Footage : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणारा अटकेत; मुंब्रा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या


सम्बन्धित सामग्री