छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यात शिंदेसेनाला मोठा धक्का बसला. आता जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप- शिवसेना युती झाली आहे. एकूण 63 जागा असून, त्यात 25 जागा शिवसेना, 27 जागा भाजप लढवत आहेत. तर सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील जागा दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहेत. गेल्या वेळेस शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमुळे सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागली होती. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असली, तरीही स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुका लढवण्याचे चित्र आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याचे एकंदरीत चित्र आहे. जिल्ह्यात 2017 ला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी करून अध्यक्षपद मिळविले होते. त्यामुळे सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. परंतु, आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad election 2026 : जिल्हा पातळीवर सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी या जिल्हा परिषदेची केली स्थापना; जाणून घ्या याचा इतिहास
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत (10 फेब्रुवारी 2026 पर्यंत) एकूण 63 वर्षे 5 महिने आणि 29 दिवसांचा काळ लोटला आहे. यापैकी सर्वाधिक 35 वर्षे 5 महिने आणि 20 दिवस काँग्रेसने सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवली. काँग्रेसच्या एकूण 17 सदस्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे 8 अध्यक्ष (12 वर्षे 2 महिने 10 दिवस), भाजपचे 3 अध्यक्ष (9 महिने 14 दिवस), तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशा प्रत्येकी एका सदस्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. 12 ऑगस्ट 1962 रोजी औरंगाबाद तालुक्यातील पिंपरीराजा येथील पद्मश्री सखाराम पवार यांना जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. सुरुवातीची सलग 18 वर्षे 8 महिने जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. महिला नेतृत्वाचा विचार करता, 21 मार्च 1997 रोजी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या अभयाताई काळुसे (काँग्रेस) यांना जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. 20 मार्च 1999 रोजी गंगापूर तालुक्यातील एकनाथ जंजाळे हे शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष बनले. तर 21 मार्च 1998 रोजी आसाराम तळेकर हे भाजपचे पहिले अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. 2013 मध्ये विजया चिकटगावकर यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले, त्या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. 1999 मध्ये अपक्ष विठ्ठलराव थोरात यांनी 25 दिवस प्रभारी अध्यक्षपद भूषवले होते.
तालुके
1 खुलताबाद
2 छत्रपती संभाजीनगर तालुका
3 सोयगाव
4 सिल्लोड
5 गंगापूर
6 कन्नड
7 फुलंब्री
8 पैठण
9 वैजापूर
आतापर्यंत अध्यक्षपदाचे आरक्षण -
1960 - 1981 सर्वसाधारण
1981 - 1992 प्रशासक
1992 - 1997 खुला प्रवर्ग
1997 - 2002 खुला प्रवर्ग
(1995 मंडल आयोगानंतर)
2002 - 2007 अनुसूचित जाती
2007 - 2012 ओबीसी
2012 - 2017 खुला प्रवर्ग
2017 - 2022 महिला राखीव
2022 - 2025 प्रशासक
जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (2017 ते 2022) -
भाजप - 23
शिवसेना -18
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी - 3
मनसे - 1
रिपाइं (डेमोक्रेटिक) - 1