Saturday, February 14, 2026 03:43:51 AM

BMC Election 2026 : चेंबूरमध्ये मध्यरात्रीचा थरार! वॉर्ड 153 च्या मतदान केंद्रात शिरला आमदाराचा मुलगा; ठाकरे गट आक्रमक

बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास शिंदे गटाचे आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते काही पदाधिकाऱ्यांसह थेट मतदान केंद्रात शिरल्याने एकच गोंधळ उडाला.

bmc election 2026  चेंबूरमध्ये मध्यरात्रीचा थरार वॉर्ड 153 च्या मतदान केंद्रात शिरला आमदाराचा मुलगा ठाकरे गट आक्रमक

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) मतदानासाठी काही तास उरले असतानाच, चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये प्रचंड खळबळ उडाली. बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास शिंदे गटाचे आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते हा काही पदाधिकाऱ्यांसह थेट मतदान केंद्रात शिरल्याने एकच गोंधळ उडाला. या प्रकारामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बनावट ओळखपत्र आणि मध्यरात्रीचा 'प्रवेश'
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना मतदान केंद्रात जाण्यास बंदी असते, तेव्हा शिंदे गटाचे पदाधिकारी बनावट ओळखपत्र घेऊन आत शिरलेच कसे? आमदार पुत्र तुषार काते यांच्यासह रवींद्र महाडिक आणि लक्ष्मण पांढरे हे केंद्रात दिसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. "आमच्याकडे या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ पुरावा म्हणून उपलब्ध आहे," असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्पक्षतेवर हल्ला चढवला.

पैसे आणि भेटवस्तू वाटपाचे गंभीर आरोप
या राड्याच्या पार्श्वभूमीवर, चेंबूरच्या खारदेवनगर भागात पैसे आणि पणत्यांचे वाटप केल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. वॉर्ड 153 मधून आमदार तुकाराम काते यांची सून तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या मीनाक्षी पाटणकर उमेदवार आहेत. या चुरशीच्या लढतीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी घरोघरी जाऊन पैसे वाटले जात असल्याचा दावा अनिल पाटणकर यांनी केला. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत, त्यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar: निवडणूक आयोगाचा अजब कारभार! निधनानंतर 10 वर्षांनीही माजी खासदाराचे नाव यादीत

पोलिसांची कारवाई आणि पळापळ
मध्यरात्रीच्या या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर चेंबूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून शिंदे गटाचे पदाधिकारी रवींद्र महाडिक यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, पोलिसांची गाडी येताच तुषार काते आणि लक्ष्मण पांढरे यांनी तिथून पळ काढला. या कारवाईदरम्यान पोलीस आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली असून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

आगामी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या या मतदानापूर्वी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. "पोलीस आणि प्रशासन ढिम्म आहे, आम्हाला सहकार्य मिळत नाही," अशी भावना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या वॉर्डात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar Election 2026: '.. सत्तेची आणि पैशाची मस्ती'; अंबादास दानवेंचे भाजपवर गंभीर आरोप


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या