Ranveer Singh received death threats: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. कुप्रसिद्ध गँगस्टर हॅरी बॉक्सर याची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली असून, यामध्ये त्याने रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकीची व्हॉइस नोट रणवीरच्या मॅनेजरला पाठवण्यात आली असून, यामुळे सिनेसृष्टीत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. गँगस्टरने केवळ रणवीरलाच नाही, तर संपूर्ण बॉलिवूडला 'लाईनवर' येण्याचा इशारा दिला आहे.
रोहित शेट्टीला मदत केल्यामुळे गँगस्टर संतप्त
हॅरी बॉक्सरने पाठवलेल्या या व्हॉइस नोटमध्ये रणवीरच्या खाजगी आयुष्याबद्दल आणि त्याच्या हालचालींबद्दल माहिती असल्याचा दावा केला आहे. गँगस्टरने अत्यंत जहाल भाषेत म्हटले आहे की, "रणवीर सिंग, तू रोहितला (रोहित शेट्टी) पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिलास आणि स्वतःही गेलास. आता बघ तुझी ऐशी-तैशी कशी करतो ते. तू कुठे राहतो, कधी कुठे जातो, याचे सर्व डिटेल्स आमच्याकडे आहेत." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये हॅरी बॉक्सरने पोर्तुगालमध्ये झालेल्या एका गोळीबाराची जबाबदारीही स्वीकारली आहे.
हेही वाचा - Rajpal Yadav : छोटा राजनसारख्या कुख्यात गँगस्टरच्या शेजारच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी
"पोलिसांकडे जाऊन फायदा नाही", गँगस्टरचा इशारा
गँगस्टरने रणवीरला बजावले आहे की, पोलिसांकडे जाऊन काहीही फायदा होणार नाही. उलट, पोलिसांकडे गेल्यामुळे गँगचा राग अधिक वाढेल आणि त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा त्याने दिला आहे. त्याने संपूर्ण इंडस्ट्रीला उद्देशून म्हटले आहे की, "वेळेत लाईनवर या, नाहीतर तुमची अक्कल ठिकाण्यावर आणू. आम्ही कधीही तुमच्या दारावर ठकठक करू." या जहाल धमकीमुळे रणवीरच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मॅनेजरच्या फोनवर 'खतरनाक' ऑडिओ नोट आल्यानंतर रणवीरच्या सुरक्षेत वाढ
रणवीरच्या मॅनेजरला ही क्लिप मिळाल्यापासून त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. गँगस्टरने क्लिपमध्ये सुनील मीरा आणि स्वतः मिळून सुखदेव जावंदाच्या दुकानावर गोळीबार केल्याचाही दावा केला आहे. "तो भारतीय लोकांना कामावर ठेवतो, पण पैसे देत नाही; आता फक्त ट्रेलर दाखवलाय, पुढच्या वेळी थेट डोक्यात गोळी घालू," अशा शब्दांत त्याने दहशत माजवली आहे. मुंबई पोलीस सध्या या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - Film Project Fraud: दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; दोन महिन्यांनंतर होणार तुरुंगातून सुटका