Bride Calls Police after Groom Look Mismatch : ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरीने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे लग्नमंडपात मोठी खळबळ उडाली. लग्नाचे विधी सुरू असताना आणि हार घालण्याची वेळ जवळ आली असतानाच, नवरीने अचानक स्टेजवरून खाली उतरून लग्नास नकार दिला. 'मला लग्नाआधी जो मुलगा दाखवला होता तो एखाद्या हिरोसारखा दिसत होता, पण हा मुलगा तो नाहीच,' असा खळबळजनक दावा तिने सर्वांसमोर केला. वधूच्या या पवित्र्यामुळे आनंदाच्या वातावरणात असलेल्या वऱ्हाडी मंडळींना मोठा धक्का बसला आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला.
हार घालताना फुटले बिंग? नवरीने बोलावले पोलीस
ही घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात गोहपारू परिसरात घडली असून, नवरदेवाने वधूच्या गळ्यात माळ घातल्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाला. जेव्हा नवरीची नवरदेवाच्या गळ्यात माळ घालण्याची वेळ आली, तेव्हा तिने नवरदेवाला जवळून न्याहाळले आणि तिचे पाय लटपटले. तिने हार न घालताच थेट स्टेज सोडले आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहत पोलिसांना पाचारण केले. 'लग्नासाठी ठरवलेला मुलगा हा नसून माझ्याशी फसवणूक झाली आहे,' असे तिने पोलिसांसमोर निक्षून सांगितले. घरच्यांनी तिची समजूत काढण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र ती आपल्या निर्णयापासून जराही मागे हटली नाही.
हेही वाचा - Digital Arrest: अंत्यसंस्कार सुरू असतानाच वाजला मृत महिलेचा फोन; एका कॉलने उघड केला ‘डिजिटल अरेस्ट’चा थरारक खेळ
वर पक्षाचा युक्तिवाद आणि मांडवातील तणाव
नवरीच्या या वागण्यामुळे वर पक्षाकडूनही संताप व्यक्त करण्यात आला. 'आम्ही कोणताही हुंडा मागितला नाही, मग अचानक लग्न का मोडतेयस?' असा सवाल त्यांनी वधूला केला. मात्र, वधूने स्पष्ट केले की, सौंदर्याच्या बाबतीत आपली फसवणूक झाली आहे. वधू आणि वर पक्षातील वाद विकोपाला गेल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दोन्ही कुटुंबांकडून परस्पर संमतीने लग्न रद्द केल्याचे लेखी लिहून घेतले.
वधूशिवाय वऱ्हाड परतले; खर्च गेला वाया
अखेरीस, ज्या उत्साहात वऱ्हाड आले होते, त्याच उत्साहावर विरजण पडले आणि नवरदेवाला नवरीशिवाय परतावे लागले. या संपूर्ण गोंधळात लग्नासाठी करण्यात आलेला 100 टक्के खर्च वाया गेला असून या प्रकाराची आजूबाजूच्या गावांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सध्या या विचित्र लग्नाची चर्चा संपूर्ण शहडोल जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये रंगली आहे. हा फसवणूक करून लग्न लावण्याचा हा प्रयत्न होता की, वधूचा गैरसमज, यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा - Child Passport Rules: पालकांनो लक्ष द्या! अल्पवयीन मुलांना आता दोन पासपोर्ट बाळगता येणार नाहीत; केंद्र सरकारचा नवीन नियम लागू