नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या व्यतिरिक्त देशातील लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ४८ मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुका आणि पोटनिवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.
महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण खासदार होते. त्यांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. नांदेडमध्ये मतदार २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी मतदान करणार आहेत.
नांदेड व्यतिरिक्त केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय झाल्यानंतर राहुल यांनी वायनाडमधून राजीनामा दिला होता आणि रायबरेलीचा खासदार म्हणून शपथ घेतली होती. यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवणार आहेत.
उत्तर प्रदेशमधील करहल, कटेहरी, कुंदरकी, सीसामऊ, गाझियाबाद, फुलपूर, मिरापूर, मझवां, खैर या नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राजस्थानमध्ये झुंझुनू, रामगड, खींवसर, सलूम्बर, चौरासी, दौसा, देवली-उनियारा या सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सिताई, मेदिनीपूर, नैहाटी, हारोआ, मदारीहाट, तलडांगरा या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. बिहारमधील तरारी, रामगड, बेलागंज, इमामगंज या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये बरनाला, डेरा बाबा नानक, चब्बेवाल, गिद्दडबाहा या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. आसाममध्ये धोलाई, सिदली, बोंगाईगाव, बेहाली, सामगुरी या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. कर्नाटकमधील चन्नपटना, शिगगाव, संदूर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. केरळमध्ये पलक्कड, चेलक्करा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. सिक्कीममध्ये नामची-सिंघीथांग, सोरेंग-चाकुंग या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. गुजरातमधील वाव, उत्तराखंडमधील केदारनाथ, छत्तीसगडमधील रायपूर शहर दक्षिण, मेघालयमधील गांबेगरे या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.