महाराष्ट्र : निवडणूका झाल्या, निकाल लागला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा देखील मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यानंतर आता सर्वच जण वाट पाहताय ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची. त्यातच आता उद्या दिनांक 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती 'जय महाराष्ट्राच्या' सूत्रांनी दिलीय.
याबाबत सविस्तर?
उद्या दिनांक 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून दुपारी 12 च्या मुहूर्तावर शपथविधी होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्राच्या सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे 40 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. महायुती सरकारमध्ये खातेवाटपावरून वाद सुरु असल्याचं देखील बोललं जातंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही गृह खात्यासाठी आग्रही असले तरी गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे शिंदे यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही आहेत. गेली पाच वर्षे शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मात्र, या खात्याच्या कारभारावरून मुंबईतील अनेक विकासकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आता नक्की कोणतं खात कोणाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
दरम्यान 14 डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार हे तिघेच हिवाळी अधिवेशन चालवतील असे बोलले जात होते. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार जानेवारी महिन्यात केला जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती परंतु आता उद्या दिनांक 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती 'जय महाराष्ट्राच्या' सूत्रांनी दिलीय. त्यामुळे सर्वांचेच लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागून आहे.