मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांचा मूळगावी विश्रांती घेत आहेत. शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले आहे तसेच त्यांना बरे वाटत नसल्यामुळे डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच सलाईन लावून आणि औषधोपचार करुन त्यांच्या तब्येतीला आराम पडावा यासाठी आवश्यक ते उपाय केले आहेत. सध्या एकनाथ शिंदे दरे गावातील त्यांच्या घरात राहून विश्रांती घेत आहेत. शिंदेंनी भेटीगाठी थांबवल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांना ताप आहे. घशाला इन्फेकशन आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंवर चार डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.
याआधी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीचा विजय झाला. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ? यावर निर्णय घेण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईत परतले तर एकनाथ शिंदे दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत परतले. परतल्यानंतर काही तास थांबून एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी निघून गेले. सध्या एकनाथ दरे गावातील त्यांच्या घरी विश्रांती घेत आहेत. अद्याप राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार ? याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. शपथविधीबाबतची माहिती महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करुन दिली आहे. याआधी नेता निवडीसाठी भाजपाची मंगळवार 3 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.