कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने डॉक्टरांना चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. याआधी कोलकाता उच्च न्यायालयाने महिला डॉक्टर प्रकरणी सीबीआय चौकशीचे निर्देश दिले. पश्चिम बंगाल सरकार पोलिसांनी ठराविक दिवसांत दोषींना पकडले नाही तर प्रकरण सीबीआयकडे सोपवणार होते. पण उच्च न्यायालयाने प्रकरण तातडीने सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने निर्देश आल्यानंतर काही तासांतच रुग्णालयावर गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुंडांचा हल्ल्याच्या प्रयत्न अयशस्वी झाला. या घटनेनंतर आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपाचा हल्ल्यामागे हात असल्याचा संशय सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला तर भाजपाने हल्ल्यामागे तृणमूलचाच हात असल्याचा आरोप केला.
डॉक्टरांनी घेतली राज्यपालांची भेट
रुग्णालयावर गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरजी कर रुग्णालयाच्या वीस डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल सी. व्ही. ानंद बोस यांची भेट घेतली. या प्रतिनिधी मंडळात महिला डॉक्टरांची संख्या जास्त होती. डॉक्टरांनी संरक्षणाची मागणी केली. राज्यपालांनी डॉक्टरांचे निवेदन स्वीकारले आणि पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले तसेच रुग्णालयावरील हल्ल्याची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, असेही निर्देश राज्यपालांनी दिले.