Tuesday, January 14, 2025 06:18:18 AM

Womens Safety In Railway Local
लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV सज्ज

मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक उपायांबरोबरच आता आधुनिक पद्धतीनेही नजर ठेवणे शक्य झाले आहे.

लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी cctv सज्ज

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक उपायांबरोबरच आता आधुनिक पद्धतीनेही नजर ठेवणे शक्य झाले आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमधील सर्व उपनगरीय रेल्वे गाड्यांतील महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) वैशिष्ट्यांसह संरेखित करून, ऑक्टोबर २०१५ मध्ये मध्य रेल्वेवर सर्व प्रथम हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रवेशद्वारासह संपूर्ण महिला डबा व्यापला जाईल, अशा पद्धतीने सीसीटीव्ही किमान चार ते कमाल आठ कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील डब्यांचा यात समावेश आहे. उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये एकूण ७७१ महिला डबे आहेत. सर्व डब्यात एकूण ४,६२६ सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले. रेल्वे डब्यांतील सीसीटीव्हींमध्ये चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचबरोबर हाय रिझोल्यूशनमुळे व्हिडीओची क्षमताही चांगली असणार आहे. दररोज २४ तास व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची या सीसीटीव्हींची क्षमता आहे. ३० दिवसांपर्यंत या रेकॉर्डिंगचे जतन करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री