8th Pay Commission Scam : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सावधगिरीचा इशारा समोर आला आहे. आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होण्यापूर्वीच सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून, पगारवाढीच्या आमिषाने लोकांची बँक खाती रिकामी करण्याचे मोठे रॅकेट सुरू आहे. 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये पगार किती वाढणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवत आहेत.
मालवेअरचा धोका आणि फोनचा रिमोट ॲक्सेस
"8 व्या वेतन आयोगानुसार तुमची पगारवाढ तपासा" असा मजकूर या मेसेजमध्ये असतो आणि त्यासोबत एक .APK फाईल किंवा संशयास्पद PDF लिंक दिली जाते. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या I4C (भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र) या संस्थेने स्पष्ट केले आहे की, या मेसेजसोबत पाठवली जाणारी फाईल प्रत्यक्षात एक मालवेअर (Malware) आहे. एकदा का तुम्ही ही फाईल इन्स्टॉल केली की, हॅकर्सना तुमच्या फोनमधील मेसेज, OTP, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि गॅलरीचा 'रिमोट ॲक्सेस' मिळतो. यामुळे तुमचे बँक खाते हॅक करणे गुन्हेगारांना सहज शक्य होते आणि कष्टाने कमावलेले पैसे काही मिनिटांत गायब होऊ शकतात.
हेही वाचा - India - China : भारताचा अलिबाबाशी करार, पण टिकटॉकचं काय?; सरकारच्या 'त्या' निर्णयामुळे टेक विश्वात खळबळ
पगारवाढीच्या उत्सुकतेचा स्कॅमर्सकडून फायदा; सरकारकडून सावधगिरीचा इशारा
आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पगार किती वाढणार, याबाबत उत्सुकता आहे. यामुळे अनवधानाने या लिंकवर क्लिक केले जाते. स्कॅमर्सकडून आलेली फाईल डाऊनलोड करताच तुमच्या फोनचा ताबा हॅकर्सकडे जातो. केंद्र सरकारने आणि सायबर सुरक्षा एजन्सी 'सायबर दोस्त' ने स्पष्ट केले आहे की, भारत सरकार कधीही व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे अशा प्रकारच्या .APK फाईल्स किंवा वैयक्तिक माहिती मागणारे अर्ज पाठवत नाही. वेतन आयोगाची कोणतीही अधिकृत माहिती केवळ सरकारी चॅनेल किंवा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरच दिली जाते. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे म्हणजे स्वतःच्या आर्थिक नुकसानाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
स्वतःचा बचाव कसा करावा?
- कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली .APK किंवा फाईल डाऊनलोड करू नका.
- 8 व्या वेतन आयोगाच्या अधिकृत माहितीसाठी फक्त https://8cpc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पगार मोजण्यासाठी (Salary Calculator) अनधिकृत ॲप्स वापरणे टाळा.
- जर तुमची फसवणूक झाली असेल, तर त्वरित 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
हेही वाचा - Spam Protection : स्पॅम कॉल्सवर आता AI ठेवणार करडी नजर; तक्रारीविनाच संशयास्पद नंबर होणार ब्लॉक