Chandoli National Park Safari Fees Hiked : निसर्गप्रेमींचे लाडके ठिकाण असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील भ्रमंती आता पर्यटकांच्या खिशाला पूर्वीच्या तुलनेत जड पडणार आहे. वन विभागाने पर्यटन शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून नवीन दरपत्रक तातडीने अंमलात आणले आहे. या सुधारित शुल्कामध्ये वाहन प्रवेश शुल्क, गाईड फी आणि इतर विविध शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे. वन विभागाने अचानक केलेल्या या दरवाढीमुळे पर्यटकांच्या नियोजित बजेटवर परिणाम होणार आहे. या नवीन निर्णयाचा पर्यटकांच्या संख्येवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शासकीय बससेवेसाठी नवीन अटी
पर्यटनासाठी वन विभागाने काही कडक अटी लागू केल्या असून, विशेषतः शासकीय बससेवेबाबत नवीन नियम बनवण्यात आला आहे. शासकीय बसमध्ये किमान 10 पर्यटक असल्याशिवाय ती सफारीसाठी सुटणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जर आवश्यक पर्यटक संख्या पूर्ण झाली नाही किंवा शासकीय बस उपलब्ध नसेल, तरच खासगी वाहनांना उद्यानात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, पर्यटकांना आता वेळेचेही कडक पालन करावे लागेल; तिकीट खिडकी सकाळी 6.00 वाजता उघडली जाईल आणि केवळ दुपारी 3.00 वाजेपर्यंतच प्रवेश तिकिटे वितरित केली जातील.
हेही वाचा - KEM Hospital Rename : मुंबईची ओळख असणाऱ्या KEM रुग्णालयाचे नामांतर? मंत्री लोढांचे पालिकेला पत्र, नवं नावही सुचवलं
कडक नियम आणि साप्ताहिक सुट्टी
वनक्षेत्रातील शांतता आणि सुरक्षितता जपण्यासाठी दर गुरुवारी चांदोली पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी वनक्षेत्रातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर 'भारतीय वन कायदा' आणि 'भारतीय दंड संहिता' (IPC) नुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे. प्रशासनास सहकार्य करून शिस्तबद्ध पर्यटनाचा आनंद घ्यावा, अशा सूचना पर्यटकांना देण्यात आल्या आहेत.
कॅमेरा व निवास शुल्क
'डीएसएलआर' कॅमेरा : 100 रुपये
साधा कॅमेरा : 50 रुपये
कंटेनर हाऊस (सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी 10) : 1500 रुपये
अतिरिक्त बेड : 500 रुपये.
शासकीय वाहन (गाईड फीसह)
प्रौढ व्यक्ती: 250 रुपये
12 वर्षांखालील मुलेः 200 रुपये
खासगी वाहन प्रवेश शुल्क
प्रौढ व्यक्ती: 250 रुपये
12 वर्षांखालील मुले : 125 रुपये
हलके वाहन शुल्क : 500 रुपये
जड वाहन शुल्क : 750 रुपये
स्वतंत्र गाईड फी : 300 रुपये.
शैक्षणिक सहलींसाठी सवलत (खासगी वाहन)
शाहूवाडी व शिराळा तालुका : प्रौढ 150 रुपये, मुले 100 रुपये
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा प्रौढ 200 रुपये, मुले 150 रुपये
हेही वाचा - Cabinet Decisions: बायोगॅस धोरण ते IT पार्क; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासाच्या अनेक योजनांना हिरवा कंदील