Chandra Grahan 2026 Date Time and Visibility in India : हिंदू पंचांगानुसार 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी धुलिवंदनचा सण (होळीचा दुसरा दिवस) असल्याने या खगोलीय घटनेला धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तब्बल 100 वर्षांनंतर होळी-धुलिवंदनचा सण आणि चंद्रग्रहणाचा असा दुर्मिळ योग जुळून येत आहे. या ग्रहणाची वेळ, भारतात दिसणारी स्थिती आणि पाळावयाचे नियम याविषयी माहिती घेऊ..
चंद्रग्रहणाची वेळ आणि टप्पे (Lunar Eclipse Timings and Phases)
द्रिक पंचांगानुसार, 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी उपच्छाया टप्प्याने ग्रहणाला सुरुवात होईल. प्रच्छाया टप्पा दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी सुरू होईल. सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी खग्रास स्थिती सुरू होईल, तर सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी ग्रहणाची परमग्रास (सर्वोच्च) अवस्था असेल. खग्रास स्थिती सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी संपेल आणि रात्री 7 वाजून 52 मिनिटांनी उपच्छाया समाप्तीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. भारतात चंद्रोदय सायंकाळी 6 वाजून 26 मिनिटांच्या सुमारास होणार असल्याने, भारतीयांना केवळ शेवटचा टप्पा पाहता येईल.
भारतात कुठे आणि किती दिसणार?
हे चंद्रग्रहण भारतातून दृश्यमान (Lunar Eclipse Visibility Across India) राहणार आहे, मात्र त्याचे स्वरूप विविध भागांत वेगवेगळे असेल.
पूर्वोत्तर भारत: अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये हे ग्रहण अधिक स्पष्टपणे आणि जास्त काळ दिसेल. कोलकाता, गुवाहाटी या शहरांत याचा प्रभाव अधिक जाणवेल.
इतर शहरे: दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये हे ग्रहण आंशिक (Partial) स्वरूपात केवळ 20 मिनिटे दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Mahashivratri Utsav 2026 : शिवभक्तीत रमली सारी सृष्टी; अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सद्गुरूंच्या आश्रमात महादेवाचा उत्सव
सूतककाळ आणि धार्मिक नियम (Sutak Kaal and Religious Observances)
धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाचा सूतककाळ ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी लागतो. त्यानुसार, 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 39 मिनिटांपासून सूतककाळ सुरू होईल, जो ग्रहण संपेपर्यंत म्हणजे रात्री 7 वाजून 52 मिनिटांपर्यंत कायम राहील. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद राहतील. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, होलिका दहन सुतककाळ सुरू होण्यापूर्वी किंवा स्थानिक पंचांगानुसार विशेष मुहूर्तात करणे योग्य असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितले आहे.
काय आहे 'ब्लड मून' आणि ज्योतिषीय परिणाम? (Astrological Position of the Moon)
पूर्ण चंद्रग्रहणावेळी जेव्हा पृथ्वीची गडद सावली चंद्रावर पडते, तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांमुळे चंद्र लालसर किंवा तांबूस दिसतो. यालाच वैज्ञानिक भाषेत 'ब्लड मून' (Blood Moon) म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. या दिवशी चंद्र केतूसोबत असल्याने काही राशींवर मानसिक तणाव, निर्णयातील गोंधळ किंवा अनपेक्षित घडामोडींचा परिणाम जाणवू शकतो, असे ज्योतिषीय गणित सांगते. तथापि, याचा परिणाम वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून असतो.
हेही वाचा - Kedarnath Temple Doors: बाबा केदारनाथांच्या भक्तांसाठी मोठी बातमी; 'या' दिवशी उघडणार मंदिराचे दरवाजे
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)