लातूर : लातूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकर भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.