China Gold Mine Discovery 2026 : सोनं हे केवळ दागदागिन्यांसाठीच नाही, तर कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थिरतेचा मुख्य आधार मानलं जातं. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) अंदाजे 880.18 टन सोन्याचा साठा आहे, जो भारताच्या परकीय चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र, भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने गेल्या वर्षभरात सोन्याच्या अशा काही खाणी शोधून काढल्या आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. चीनला नुकत्याच सापडलेल्या खाणींमधील सोन्याचा साठा हा एकट्या RBI कडे असलेल्या एकूण साठ्यापेक्षा तब्बल तिप्पट असण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याचे दर ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहिले तर, इतका मोठा सोन्याचा साठा असलेला देश नक्कीच जगात महासत्ता ठरणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या खाणीचा शोध
चीनच्या मध्य प्रांतात सापडलेल्या खाणीतील सोन्याच्या साठ्याविषयी जाणून कोणीही नक्कीच थक्क होईल. हुनान प्रांतातील पिंगजियांग काउंटीमध्ये 'वांगू गोल्ड फील्ड' येथे सोन्याचा एक महाकाय खजिना सापडला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या एकाच ठिकाणी 1,000 टनांपेक्षा जास्त सोने असण्याची शक्यता आहे, ज्याची जागतिक बाजारपेठेतील किंमत सुमारे 85.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
खोली आणि साठा: या खाणीत 6,562 फूट खोलीवर 300 टन सोने असल्याची खात्री झाली आहे.
अंदाज: जर 9,842 फूट खोलीपर्यंत उत्खनन केले, तर हा साठा 1,000 टनांचा टप्पा पार करू शकतो. या शोधामुळे या खाणीची तुलना दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध 'साउथ डीप गोल्ड माइन'शी केली जात असून, ही जगातील सर्वात मौल्यवान खाण ठरू शकते.
समुद्राच्या तळाशीही सापडला खजिना
केवळ जमिनीवरच नाही, तर चीनने समुद्राखालीही सोन्याचा शोध लावल्याचा दावा केला आहे. आशियातील सर्वात मोठी समुद्राखालील सोन्याची खाण शानडोंग प्रांतातील जियाओडोंग द्वीपकल्पाजवळ, लाईझोउ किनारपट्टीवर सापडली आहे. या नव्या शोधामुळे लाईझोउ क्षेत्रातील एकूण ज्ञात सोन्याचा साठा आता 3,900 टनांच्या पुढे गेला आहे. हा साठा चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी सुमारे 26 टक्के इतका प्रचंड आहे. समुद्राखालील या शोधामुळे चीनचे खनिज वर्चस्व अधिकच मजबूत होणार आहे.
हेही वाचा - EU Trade Deal: भारताच्या निर्यातीला मोठा दणका! अमेरिकेनंतर युरोपनेही टॅरिफ वाढवला, व्यापार क्षेत्रात खळबळ
एका वर्षात लागलेले इतर मोठे शोध
चीनसाठी गेल्या काही महिन्यांत सोन्याचे जणू पेवच फुटले आहे. नोव्हेंबर महिन्यात लियाओनिंग प्रांतात तब्बल 1,444 टन सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा करण्यात आली होती, जो 1949 नंतरचा देशातील सर्वात मोठा शोध मानला जातो. त्याचप्रमाणे, शिनजियांग प्रांतातील कुनलुन पर्वतरांगांमध्येही 1,000 टनांपेक्षा जास्त सोन्याचे साठे आढळले आहेत. प्रगत 3D भूगर्भीय मॉडेलिंग तंत्रज्ञानामुळे चीनला इतक्या खोलीवर असलेल्या सोन्याचा ठावठिकाणा शोधणे शक्य झाले आहे.
जागतिक बाजारपेठेवर होणारा परिणाम
चीन हा आधीच जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे, ज्याने 2024 मध्ये 377 टन सोन्याचे उत्पादन केले होते. मात्र, रशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत चीनचे सिद्ध झालेले (Proven) साठे कमी होते. आता एकामागून एक लागलेल्या या शोधामुळे चीनची सोन्याची सुरक्षा (Gold Security) कित्येक पटीने वाढली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय तणाव पाहता, चीनचा हा खजिना येणाऱ्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेची समीकरणे बदलू शकतो.
हेही वाचा - India-Iran Relations: भारताच्या भूमिकेवर इराण खुश, ट्रम्प संतापले, जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ