मुंबई : शहाबाज गाव, सेक्टर १९, बेलापूर येथे एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना दिली.
मुख्यमंत्री शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली.
इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महापालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
बेलापूरमध्ये इमारत कोसळली
नवी मुंबईमधील शहाबाज गाव, सेक्टर १९, बेलापूर येथे चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यातून ५० जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.