नाशिक : सर्वत्र हवामानात बदल दिसून येत आहे. त्यातच आता नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात थंडी वाढल्याने नाशिककारांना हुडहुडी भरली आहे. नाशिक शहराचा पारा 13 अंशावर असून ग्रामीण भागात पारा 11.8 अंशांपर्यंत खाली आला आहे. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरल्याचा पाहायला मिळत आहे.
हिमालयामधील हिमवृष्टीमुळे उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये सरासरी तापमानात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हवामानावरही पाहायला मिळत आहे. मध्य भारतामधील मैदानी भागांतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिकचा पारा 12 ते 13 अंशांदरम्यान स्थिरावला आहे.
नाशिक शहर आधीच निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते त्यातच आता हि गुलाबी थंडी आणि धुक्याची चादर शहररावर पसरल्याने शहर तसेच ग्रामीण भागात सौंदर्य आणखीनच वाढलं आहे.