Wednesday, January 15, 2025 07:01:41 PM

Congress
काँग्रेसचं जनसमर्थन वेगानं घटतंय

काँग्रेसचं जनसमर्थन वेगानं घटतंय... देशातील सतरा राज्यांमध्ये काँग्रेसचे दहा टक्क्यांपेक्षा कमी आमदार उरले आहेत. भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली

काँग्रेसचं जनसमर्थन वेगानं घटतंय

नवी दिल्ली : काँग्रेसचं जनसमर्थन वेगानं घटतंय... देशातील सतरा राज्यांमध्ये काँग्रेसचे दहा टक्क्यांपेक्षा कमी आमदार उरले आहेत. भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बंगाल, दिल्ली, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, मणिपूर, नागालँड आदी राज्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे दहा टक्क्यांपेक्षा कमी आमदार उरले आहेत. 

काँग्रेसने कधी जातीच्या आधारे तर कधी धर्माच्या आधारे तर कधी महिला - पुरुष असा भेद करुन तर काही वेळा उत्तर भारत - दक्षिण भारत असा भेदाभेद करुन देशात गटतट पाडण्याचा प्रयत्न केला. सतत दिशाभूल करणारी आणि फसवणूक करणारी माहिती देणे, जनतेची फसवणूक करणे असे प्रकार काँग्रेसने केले. फक्त एका कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यात काँग्रेस गुंतली आहे. काँग्रेसच्या या वर्तनाला जनतेने पुरते ओळखले आहे. यामुळेच देशातील बहुसंख्य जनतेने काँग्रेसला नाकारण्यास सुरुवात केली आहे; असाही आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडी फक्त 46 जागा जिंकू शकली तर इतरांनी 12 जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत मविआला जबर फटका बसला. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने 20 आणि शरद पवार गटाने 10 जागा जिंकल्या. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिरवणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फक्त 16 जागांवर विजय मिळवणे जमले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 पैकी फक्त 16 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची राजकीदृष्ट्या पंचाईत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. इतके कमी आमदार जिंकून आल्यामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या ताकदीवर परिणाम झाला आहे. 

मुंबई ही राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी फक्त तीन जागांवर विजय मिळवणे काँग्रेसला जमले आहे. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात अस्लम शेख जिंकून आले. धारावीत खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड जिंकून आली तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात अमिन पटेल यांनी बाजी मारली. या तिन्ही ठिकाणी परंपरागत मतपेढीचा अर्थात व्होट बँकेचा काँग्रेसच्या उमेदवारांना फायदा झाला. पण उर्वरित मुंबईत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. ज्यांना मुंबईतही अस्तित्व राखणे कठीण झाले आहे त्या काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर किती महत्त्व द्यावे असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे. 


सम्बन्धित सामग्री