Friday, January 23, 2026 11:20:43 PM

Vasai Big News : रमाबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी वसई-विरार पालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गोन्सालविस यांना अटक

या कारवाईनंतर स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अजून तपास सुरू आहे.

vasai big news  रमाबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी वसई-विरार पालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गोन्सालविस यांना अटक

जयराज राजीवडे, प्रतिनिधी; वसई : विरार पूर्वेतील नारंगी विजय नगर येथील रमाबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी (Ramabai Apartment Mishap) महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोसळलेल्या इमारतीत 17 जणांचा मृत्यू, तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 3 ने मोठी कारवाई करत वसई-विरार महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांच्यासह सात जणांना अटक केली आहे.

तपासात बांधकामातील अनियमिततेसोबतच संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचाही उल्लेख समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, गोन्साल्विस यांनी शहरात अनेक अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले होते, असे सांगितले जात आहे. 31 जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्याच्या काही आठवडे आधीच त्यांना पोलिसांकडून अटक झाल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईनंतर स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - Maharashtra New DGP : सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती; मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलं होतं अतुलनीय शौर्य

रमाबाई इमारतीची दुर्घटना

विरार पूर्वेतील नारंगी विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला होता. ही इमारत सुमारे 10 वर्षे जुनी होती आणि महापालिकेने ती अतिधोकादायक (Highly Dangerous) म्हणून घोषित करून नोटीस देखील दिली होती, परंतु त्यावर कार्यवाही झाली नव्हती. इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे हा ढिगारा शेजारील चाळीवरही कोसळला, ज्यामुळे अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच NDRF आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

17 जणांचा मृत्यू आणि बचाव कार्याची समाप्ती
सुमारे 36 तासांहून अधिक काळ चाललेल्या बचावकार्यानंतर, या दुर्घटनेत एकूण 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अंतिम माहिती आहे, तर 9 ते 14 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुंद रस्ते आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ढिगारे हातानेच काढावे लागले. ही दुर्घटना गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच घडल्यामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. यामध्ये एका कुटुंबातील लहान चिमुरडीचा वाढदिवस सुरू असतानाच तिच्यासह आई आणि वडिलांचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती.

हेही वाचा - IIT Kanpur MANAS Network: मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर आता तीक्ष्ण नजर; IIT कानपूरने लाँच केले खास ‘मानस’ नेटवर्क


सम्बन्धित सामग्री