IND vs SL Super Over : आशिया कप 2025 च्या सुपर 4 मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना अत्यंत रोमांचक ठरला. या सामन्यात दोन्ही संघांनी पूर्ण ताकद लावली, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला आणि त्याचे रूपांतर सुपर ओव्हरमध्ये झाले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावांचे आव्हान ठेवले होते, तर श्रीलंकेनेही दमदार फलंदाजी करत बरोबर 202 धावा केल्या. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने शानदार शतक झळकावले.
सूर्यकुमार यादवचा अर्शदीप सिंगवर विश्वास
सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवकडे अर्शदीप सिंग हा एकमेव गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध होता. सामन्यानंतर बोलताना सूर्याने अर्शदीपवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि सुपर ओव्हरपूर्वी त्यांच्यात झालेल्या संभाषणाचा खुलासा केला. सूर्या म्हणाला, "अर्शदीप अनेकदा अशा परिस्थितीत राहिला आहे आणि त्याने नेहमीच चांगले प्रदर्शन केले आहे."
'त्या' एका गोष्टीवर लक्ष देण्याची सूचना
सूर्यकुमार यादवने अर्शदीपला फक्त एकच गोष्ट सांगितली होती: "मी फक्त एवढेच सांगितले होते की, आपल्या योजनांवर लक्ष केंद्रित कर (Focus on your plans) आणि इतर कशाचाही विचार करू नकोस. आपण आधीच अंतिम फेरीत पोहोचलो आहोत; पण स्वतःचा प्लॅन बनव आणि त्याची अंमलबजावणी कर." सूर्याने अर्शदीपच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आणि सांगितले की, "सुपर ओव्हरसाठी अर्शदीपशिवाय दुसरा कोणीही नव्हता."
हेही वाचा - Asia Cup 2025 : अंतिम सामन्यापूर्वी भारताची श्रीलंकेशी लढत! India vs Sri Lanka सामन्यात अभिषेक शर्माने 22 चेंडूत झळकावले अर्धशतक
भारताचा सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सुपर ओव्हरमध्ये फक्त 2 धावा केल्या आणि त्यांच्या दोन विकेट गेल्या. त्यानंतर भारताने पहिल्याच चेंडूवर तीन धावा घेत विजय संपादित केला आणि सामन्यावर शिक्कामोर्तब केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या खेळाडूंना त्यांच्या योजनांवर ठाम राहण्याचे आणि कोणत्याही दबावाखाली न येण्याचे आवाहन केले. या सामन्याला त्याने अंतिम सामन्यासारखे महत्त्व दिले असल्याचे सांगितले आणि संघातील खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक केले. अंतिम सामन्यासाठी संघ पूर्णपणे तयार असेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
हेही वाचा - Ind VS Pak : पाकिस्तानबरोबरच्या सामन्याआधीच भारतीय संघातील तीन खेळाडूंना गंभीर दुखापत, चिंता वाढली