मुंबई : संक्रातीच्या सणाला नायलॉन मांजामुळे गालबोट लागले आहे. नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी असतानाही प्रशासनाच्या सुस्त कारवाईमुळे दोघांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण गळा चिरल्याने गंभीर जखमी झाले आहेत. नायलॉन मांजाच्या विक्रीवर पूर्णतः बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री झाल्याची अनेक उदाहरणे यानिमित्ताने समोर आली आहेत. या सणाला लागलेल्या गालबोटामुळे नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन अनेक संस्थांनी केले आहे. मांजाच्या विक्रीविरोधात भरारी पथके नेमली असतानाही ही विक्री सुरूच आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नाशिक- नंदूरबारमध्ये मांजाचे बळी
नाशिकमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. संक्रांतीच्या सणासाठी सोनू धोत्रे गुजरातहून नाशिकला आला होता. पाच महिन्यानंतर लग्न होणार होते. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. आला अन् मांजामुळे जीव गेला. सोनू धोत्रे असे तरूणाचे नाव आहे. सोनू धोत्रेच्या आईवडिलांचे निधन झाले असून तो भावाला भेटण्यासाठी आला होता. देवळाली कॅम्पकडे मोटर सायकलवरून सोनू जात होता. नायलॉन मांजामुळे फास लागला अन् गळा चिरला गेला.
नंदूरबारमधील अन्य घटनेत कार्तिक गोरवे आजोबांसह मोटारसायकलवर जात होता. गळ्यात मांजा अडकला आणि कार्तिकचा गळा चिरला. कार्तिकला जिल्हा रूग्णालयात नेले मात्र, उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली.
हेही वाचा : कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन
नायलॉन मांजाने बळी घेतल्याच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या येवला पोलिसांच्या भरारी पथकाने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. या चौघांकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील पालिका कर्मचारी मंगशे बोपटे हा दुचाकीवरून जात असताना गळ्यात मांजा अडकल्याने त्याचा गळा चिरला. त्याच्या गळ्यावर 15 टाके पडले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. भंडारामध्येही मोटार सायकलवरून जाणाऱ्या शुभम चौधरी याचा गळा मांजामुळे चिरला गेला. सुदैवाने त्याचा जीव वाचला.
हेही वाचा : मकरसंक्रांतीनिमित्त चाफळच्या श्रीराम मंदिरात महिलांची गर्दी
राज्यात आज संक्रात सणाच्या निमित्ताने पतंगबाजीचा उत्साह शिगेला पोहोचला असला तरी अनेक ठिकाणी नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भिवंडीत महानगर पालिकेने केलेल्या धडक कारवाईत नायलॉन मांजा जप्त केला आहे. प्रत्येक मकरसंक्रातीला नायलॉन मांजावरील बंदीची चर्चा होते. या मांजाच्या विक्रीची बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री आणि वापर होतो. नायलॉन मांजामुळे प्रतिवर्षी बळी जातात, तर अनेकजण जखमी होतात. मांजावरील कारवाई अधिक कठोरपणे होणे आवश्यक आहे.