Diwali Padwa 2025 : अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी, म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला पाडवा साजरा केला जातो. बलिप्रतिपदा या नावाने ओळखला जाणारा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस फक्त धार्मिकच नाही, तर पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि व्यावसायिक वर्षाची सुरुवात यासाठीही विशेष महत्त्वाचा असतो. या दिवसाला दिवाळी पाडवा (Diwali Padwa) असेही म्हटले जाते.
बळीप्रतिपदेमागील पौराणिक कथा अशी आहे की, याच दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप धारण करून अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार राजा बळीला पाताळात धाडले. भगवान विष्णूंनी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला पाताळाचे राज्य देऊन स्वतः त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे कार्य स्वीकारले. या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पूजेनंतर बळीराजाच्या प्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान केले जाते. तसेच, शेतकरी लोक सकाळी शेतात जाऊन मडक्यात कणकेचा पेटलेला दिवा नेऊन शेताच्या बांधावर पुरून ठेवतात आणि बळीराजाची पूजा करतात.
हेही वाचा - Diwali Padwa 2025 : बलिप्रतिपदा म्हणजे काय? जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि महत्त्व
पती-पत्नीचे विशेष नाते
पाडव्याच्या दिवशी वडीलधाऱ्यांना आणि पतीला पाटावर बसवून त्यांच्याभोवती रांगोळी काढली जाते आणि औक्षण केले जाते. या दिवशी माहेरी आणि सासरी पुरुषांना तेल लावण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. आपला वैवाहिक संसार उज्ज्वल व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहो, यासाठी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पतीदेखील पत्नीला ओवाळणी देतो. नवविवाहित जोडप्यांसाठी तर ही पहिली दिवाळी खास असते, जेव्हा मुलीच्या माहेरी दिवाळसण केला जातो आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर दिला जातो.
व्यापारी वर्ग आणि इतर परंपरा
या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची विशेष पद्धत आहे. व्यापारी वर्ग या दिवसापासून त्यांच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्यांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा केली जाते. तसेच, या दिवसापासूनच विक्रमी संवत सुरू होते. अनेक ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते, ज्याला उत्तर भारतात जास्त महत्त्व आहे. या दिवशी विष्णूंची पूजा करून त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो आणि या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. या दिवसाला द्यूत प्रतिपदा देखील म्हटले जाते; कारण एका पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला द्यूत खेळात हरवले होते. या सर्व विधींबरोबरच, "इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो" अशी विनवणी परमेश्वराकडे केली जाते.
हेही वाचा - Diabetic Dessert Ideas:दिवाळीत गोड खाण्याची चिंता? मधुमेहींसाठी स्वादिष्ट आणि सुरक्षित 'हे' 5 पर्याय
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)