Nana Patole Letter to CM: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवरून आता राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले आहेत. 'निवडणूक प्रक्रियेवरून जनतेचा विश्वास उडाला असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 'ईव्हीएम' (EVM) ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात,' अशी आक्रमक मागणी पटोले यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाचा अकार्यक्षम कारभार
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचा दावा पटोले यांनी पत्रात केला आहे. हजारो मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी तासनतास वणवण करावी लागली, तर अनेकांना मतदान न करताच घरी परतावे लागले, असंही पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. तथापी, बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर लगेच निघून जात असल्याचे व्हिडिओ समोर आल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरी भागातील अत्यल्प मतदानाचे कारण केवळ उदासीनता नसून निवडणूक व्यवस्थेवरील लोकांचा उडालेला विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केलं आहे.
हेही वाचा - BMC Election 2026 Voting Count : भरपगारी सुट्टी, तरीही मतदानाची टक्केवारी कमी! 2017 पेक्षा 3 टक्क्यांनी मतदान घटले; पहा किती मतदारांनी मतदान केलं
VVPAT नसल्याने संशयाचे भूत
या निवडणुकांमध्ये VVPAT प्रणाली का वापरली गेली नाही? असा सवाल करत पटोले यांनी मतदारांचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला आहे. मतदाराला आपण कुणाला मत दिले याची खात्रीच करता आली नसल्याने ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
हेही वाचा - Ameet Satam : 'ठाकरेंचा 25 वर्षांतील तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार उघड करणार...'; अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला
'महाराष्ट्रात ईव्हीएमचा हट्ट कुणासाठी?'
देशातील अनेक राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जात असताना महाराष्ट्रातच ईव्हीएमचा हट्ट का? असा सवाल पटोले यांनी विचारला आहे. ग्रामीण लोकशाहीचा कणा असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जर पारदर्शकता नसेल, तर त्याचे राज्याच्या लोकशाही आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी पत्रात दिला आहे.